प्रतिनिधी /फोंडा
उज्जैन-मध्यप्रदेश येथील महाकाल लोक कॉरिडोअरच्या लोकार्पण सोहळय़ानिमित्त भाजपातर्फे मंगळवारी देशभरातील विविध शिवमंदिरामध्ये अभिषेक व पुजाविधीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून फोंडा तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांतर्फे नागझर-कुर्टी योथील महादेव मंदिरात सामुहिक पुजाविधी व अभिषेक करण्यात आला.
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर व फोंडय़ाचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्याहस्ते शिव पिंडिकेवर दुग्धाभिषेक व आरती करण्यात आली. यावेळी फोंडा भाजपचे अध्यक्ष विश्वनाथ दळवी, शिरोडा भाजपाचे अध्यक्ष सूरज नाईक, मडकईचे अध्यक्ष प्रदीप शेट, नगरसेवक आनंद नाईक, महिला मोर्चा सरचिटणीस अनिता कवळेकर, देवस्थानचे अध्यक्ष उल्हास नाईक तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ासंख्येने उपस्थित होते.
वाराणसी व काशी विश्वनाथ या हिंदू धर्मातील पवित्र स्थळांच्या विकासानंतर उज्जैन येथील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या महाकाल मंदिराचा रु. 850 कोटी खर्चून विकास करण्यात आला आहे. प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे असलेल्या या मंदिराकडे जाण्यासाठी छोटय़ा पायवाटा होत्या. त्यांचे रुपांतर प्रशस्त अशा कॉरीडोअरमध्ये करण्यात आले आहे. याशिवाय धार्मिक प्रतिकांसह सौंदर्यस्थळेही विकसित करण्यात आली आहेत. त्यामुळे जगभरातील भाविक व पर्यटकांसाठी ती आकर्षण स्थळ बनली आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे देशातील धार्मिक पर्यटनाला एक नवीन कलाटणी मिळाल्याचे असे नरेंद्र सावईकर म्हणाले. उज्जैन महाकाल कॉरीडोअर हा देशातील धार्मिक पर्यटनाला चालना देणारा एक आधुनिक प्रकल्प आहे. त्यातून मोदी सरकारचा विकासाबाबत दृष्टीकोन दिसून येतो असे रितेश नाईक म्हणाले. महाकाल लोकार्पण सोहळय़ाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात आठ ठिकाणी शिवमंदिरांमध्ये असे धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विश्वनाथ दळवी यांनी स्वागत तर सूरज नाईक यांनी आभार मानले.