वार्ताहर/ मडकई
राज्यस्तरीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव आज रविवार 19 रोजी फर्मागुडी येथे साजरा होणार आहे. माहिती व प्रसिद्धी खाते, बांदोडा ग्रामपंचायत व कवळे जिल्हा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.
सकाळी 8.30 वा. जगदंब ढोल ताशा पथक व बालभवनचे विद्यार्थी पोवाडे सादर करतील. त्यानंतर 8.45 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत फर्मागुडी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वाऊढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. यावेळी कृषीमंत्री रवी नाईक, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, बांदोडाचे सरपंच सुखानंद गावडे, कवळे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, माहिती खात्याचे सचिव सुभाष चंद्रा, संचालक दीपक बांदेकर, इतिहासकार डॉ. अमर अडके आदी मान्यवर पुष्पांजली अर्पण करतील.
डॉ. अमर अडके यांचा अल्प परिचय
प्रमुख वक्ते डॉ. अमर अडके हे महाराष्ट्र मैत्रेय प्रतिष्ठानमधील किल्ले ट्रॅकिंग, संवर्धन, अभ्यास आणि ट्रकिंग चळवळतील अग्रगण्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकारच्या गडकोट संवर्धन समितीचे माजी सदस्य आहेत. दुर्ग भटकंती, अरण्य भटकंती आणि गिर्यारोहणाचा सुमारे 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. या कालावधीत 454 किल्ले, शेकडो घाट वाटा, कित्येक अरण्ये यांची अभ्यासपूर्ण भटकंती आणि त्यांची साडेतेरा हजार छायाचित्रांसह डॉक्युमेंटेशन केले आहे. ‘सह्याद्रीच्या गिरी शिखरावरून’ हे त्यांचे अत्यंत गाजलेले पुस्तक. या पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सन् 2020 चा सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती आणि प्रकाशन पुरस्कार प्राप्त झालेला आहे.