चार रस्ता येथे ध्वजस्तंभांची उभारणी, तर चावडी बसस्थानकावर अर्धपुतळ्याची स्थापना, पैंगीण येथे मिरवणूक
काणकोण : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिनी काणकोण तालुक्यातील माशे, पैंगीण, चावडी आणि चार रस्ता येथे शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून गुळे ते पैंगीणपर्यंतच्या संपूर्ण रस्त्यावरील परिसर छत्रपतींचा जयघोष आणि भगव्या ध्वजाबरोबर ढोलताशांचा गजर यांनी दुमदुमून सोडला. चार रस्ता येथील जंक्शन आणि बगलमार्गावर शिवप्रेमी नागरिकांनी या दिवसाचे औचित्य साधून भगवे ध्वज फडकविले, तर चावडीवरील कदंब बसस्थानकावर युनायटेड काणकोणतर्फे छत्रपतींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सभापती रमेश तवडकर यांनी या अर्धपुतळ्याचे अनावरण केले. चार रस्ता, चावडी या दोन्ही ठिकाणी पुरोहित सर्वेश हेगडे यांनी धार्मिक कार्य केले. या दोन्ही ठिकाणी काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, नगरसेवक धीरज ना. गावकर, शुभम कोमरपंत, सुप्रिया ना. गावकर, हेमंत ना. गावकर, बबेश बोरकर, प्रशांत देसाई, दिलीप केंकरे, सम्राट भगत, दिवाकर पागी, सिद्धार्थ देसाई, गुरू गावकर, वल्लभ देसाई, दिलखुश शेट, सूरज भैरेली, पंकज ना. गावकर, विनय तुबकी, डॉ. दिवाकर वेळीप, संदेश तेलेकर, महेश नाईक, शिरीष पै, पैंगीणचे पंच सतीश पैंगीणकर, भाजप पदाधिकारी सर्वानंद भगत, जनार्दन भंडारी, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, नंदीप भगत, सूरज ना. गावकर, ओंकार देसाई, सुदर्शन देसाई, रणजित देसाई, बलेश देसाई, आगोंदचे माजी सरपंच प्रमोद फळदेसाई, नवज्योत ना. गावकर आणि अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाच्या शिवजयंती सोहळ्यांत युवकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला. चार रस्ता येथील जंक्शनवर आणि बगलमार्गावर खास ध्वजस्तंभ उभारण्यात आलेले असून हे दोन्ही ध्वज 24 तास फडकत राहतील. चावडीवरील कदंब बसस्थानकावर बसविण्यात आलेला शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा काणकोण तालुक्यात येणाऱ्या प्रत्येकाच्या कायम स्मरणात राहावा यादृष्टीने युनायटेड काणकोण लक्ष देणार असल्याची माहिती जितू देसाई यांनी दिली. त्यापूर्वी काणकोणच्या भाजप कार्यालयात सकाळी छत्रपतींच्या अर्धपुतळ्याला सभापती रमेश तवडकर यांनी पुष्पमाला अर्पण करून त्यांचे स्मरण केले. यावेळी काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, दामोदर शेणवी, आनंदू देसाई, दिवाकर पागी, राजेंद्र बोरकर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. पैंगीण येथे शिवप्रेमी नागरिकांनी खास श्री परशुराम देवालय ते श्रद्धानंद विद्यालयापर्यंत ढोलताशांच्या गजरात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली. यानिमित्त संपूर्ण परिसरात रस्त्याच्या बाजूला भगव्या ध्वजांची आरास करण्यात आली होती. श्रद्धानंद विद्यालयाच्या पटांगणावर मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर कोल्हापूर येथून आलेल्या कलाकारांनी शिवशाहीवरील पोवाडे सादर केले.