Tarun Bharat

शिवसैनिकांची कोगनोळीनजीक पुन्हा अडवणूक

शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना परत पाठविले महाराष्ट्रात : सीमेवर चोख पोलीस बंदोबस्त

वार्ताहर /कोगनोळी

1 नोव्हेंबर हा बेळगाव जिल्हय़ातील मराठी भाषिक काळा दिन म्हणून पाळतात. यावेळी जिल्हय़ातील मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक बेळगावला येत असतात. परंतु कर्नाटक प्रशासनाकडून येथील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱया कोगनोळी (ता. निपाणी) येथील दूधगंगा पुलावर पोलिसांतर्फे अडवणूक करून त्यांना परत महाराष्ट्रात पाठवून दिले जात आहे. शिवसैनिकांना कर्नाटकात प्रवेशबंदी करून त्यांना परत पाठविण्यासाठी दूधगंगा नदी परिसरात कर्नाटक शासनाच्या वतीने पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

 मंगळवार दि. 1 रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या दरम्यान शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे बेळगावला जाण्यासाठी येथील दूधगंगा पुलावर आले असता कर्नाटक पोलिसांकडून त्यांची अडवणूक करण्यात आली. यावेळी विजय देवणे यांनी आपण कोणत्याही प्रकारचा मोर्चा न घेऊन जाता बेळगाव जिल्हय़ातील मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी चाललो आहे. तरी आपल्याला सोडण्यात यावे, अशी विनंती पोलीस अधिकाऱयांना
केली.

परंतु येथील उपस्थित पोलीस अधिकाऱयांनी कर्नाटक प्रवेशबंदी असल्याने सोडण्यात येणार नसल्याचे त्यांना सांगितले. यावेळी बोलताना शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, मराठी भाषिकांना न्याय मिळावा म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने कायम आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्नाटक शासनाकडून मराठी भाषिकांची अडवणूक सुरू आहे. लोकशाही मार्गाने न्याय मागण्यासाठी जात असताना कर्नाटक शासनाने दिलेली वागणूक ही निंदनीय आहे. यासाठी पोलीस प्रशासन व शासनाचा निषेधही देवणे यांनी व्यक्त केला.

बेळगावला कोल्हापुरातून जात असताना आज परत एकदा कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांनी दडपशाहीचे धोरण सुरू केले आहे. आज ज्या पद्धतीने कर्नाटकवाले आपला राजोत्सव साजरा करतात तसे आम्ही 1956 सालापासून काळा दिन साजरा करतो. ही अडवणूक चुकीचे असल्याचे सांगितले.

यावेळी डीवायएसपी व्ही. टी. दोड्डमणी, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस तळवार, महादेव एस. एम, तवराप्पा एस. एल, ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार अनिल कुंभार यांच्यासह पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Related Stories

विविध ठिकाणी वनक्षेत्राला आगीची झळ

Omkar B

ऍन्टीबॉडीज तपासण्यासाठी बेळगावात होणार सर्वेक्षण

Patil_p

पशु संगोपन खात्यातर्फे जिल्हय़ात 2 हजार रोपांची लागवड

Patil_p

कृषीतज्ञांनी पिकांची केली प्रत्यक्ष पाहणी

Omkar B

बेळगुंदी फाट्याजवळ बनला कचरा डेपो

Amit Kulkarni

बसवन कुडचीत आज मूर्तीप्रतिष्ठापना

Amit Kulkarni