ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आमदार तानाजी सावंत यांचे कात्रज येथील कार्यालय आज सकाळी संतप्त शिवसैनिकांनी फोडले. यावेळी सावंत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर सावंत त्यांचे कात्रज येथील कार्यालय आणि घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिंदे समर्थक आमदारांना धडा शिकवण्याची सुरूवात त्यांनी पुण्यातून केली आहे. शिवसैनिकांनी कात्रजमधील सावंत प्लाझा येथे असलेल्या आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. सावंत हे सत्ता असताना शिवसेनेत आले. त्यांनी सर्व पदे उपभोगली आणि आता पक्षाशी गद्दारी केली, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
तानाजी सावंत भूम परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 साली शिवसेना भाजपच्या सत्तेत तानाजी सावंत यांच्यावर मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, 2019 ला महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर शिवसेनेनं तानाजी सावंत यांनी मंत्रीपदाची संधी दिली नाही. तेव्हापासूनच सावंत नाराज होते.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिदे यांच्या तर्फे उभारण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या बोर्डालाही पुण्यात काळे फासण्यात आले आहे.