ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील अंधेरी पूर्वचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (Shiv Sena MLA Ramesh Latke passes away) ते 52 वर्षांचे होते. लटके आपल्या कुटुंबियांसह दुबईला फिरण्यासाठी गेले होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. लटके यांचे पार्थिव मुंबईत आणण्याची तयारी सुरू असून, लवकरच त्यांचे पार्थिव मुंबईत आणलं जाणार आहे.
1997 साली लटके हे मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर सन 2002 आणि 2009 च्या निवडणुकीतही नगरसेवक राहिले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत लटके पहिल्यांदा विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. भाजपचे उमेदवार सुनील यादव यांचा त्यांनी त्यावेळी पराभव केला होता. 2019 मध्येही लटके यांच्यावर अंधेरी पूर्वच्या मतदारांनी विश्वास दाखवत त्यांना निवडून दिले. 2019 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा 16 हजार 965 मतांनी पराभव केला होता.