ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संभाजीराजे छत्रपतींना (sambhajiraje chhatrapati) पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिलं होतं. पण संभाजीराजे यांनी शिवसेनेची ही ऑफर नाकारली. संभाजीराजे यांच्या नावाला पूर्णविराम मिळाल्याने शिवसेना (shivsena) आज संध्याकाळपर्यंत आपला दुसरा उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवणार असल्याचं आधीच जाहीर करण्यात आलं आहे. या सहाव्या जागेच्या उमेदवारीसाठी संभाजीराजे छत्रपतींना आज दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र, संभाजीराजे यांनी ही ऑफर नाकारली. त्यामुळे शिवसेना आपला उमेदवार जाहीर करणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आज संध्याकाळी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी एका ज्येष्ठ शिवसैनिकाचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे संभाजीराजे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती मिळत होती. पण आता मराठा क्रांती मोर्चाच्या पुण्यातील समन्वयकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजीराजे यांच्या राजकीय भूमिकेचा काहीही संबंध नाही. मराठा क्रांती मोर्चा एक सामाजिक चळवळ आहे. संभाजीराजेंचा राजकीय निर्णय ही त्यांची वैयक्तीक भूमिका आहे. आमचा त्यांना पाठिंबाही नाही आणि विरोधही नाही. दरम्यान, समन्वयकांच्या या भूमिकेनंतर संभाजीराजे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.