माझ्या शिवसैनिकांसाठी मी नेहमी झटलो.हिंदुत्वाचा विचार आम्ही कधीही सोडलेला नाही. मुख्यमंत्री आमचेच असताना आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. शिरुर मतदारसंघात शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल झाले. शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटात सामील झालेले सेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर आज पहिलीच प्रतिक्रिया माध्यमांना दिली. यावेळी त्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ज्यांची गरज मतदारसंघात होती ते मतदारसंघात कधीच नव्हते असा टोला खासदार अमोल कोल्हेंना लगावला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्यात मोठी बंडाळी झाली. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव जाहिर झाल्यानंतर कर्तव्य म्हणून मी अभिनंदन केलं. तर पक्षाने तिसऱ्या दिवशी मला काढून टाकलं. काही नसताना तिनवेळा मी खासदार म्हणून निवडून आलो. रात्रदिवस कामं केली. शिवसैनिकांसाठी भांडतोय. मात्र शुभेच्छा दिल्या म्हणून हकालपट्टी करतायं. एकदा माझ्याशी बोलायचं तरी होतं अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले, आजपर्यंत मतदारसंघासाठी जो निधी मिळाला तो केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळे मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
सामना या वर्तमान पत्रात बातमी छापून आल्यानंतर मी ती बातमी पक्षप्रमुखांना पाठवली. यानंतर त्यांनी मला काॅल केला आणि भेटायला बोलावलं. आमची चर्चा झाली. या बैठकित नजरचुकीने छापलं अस मला सांगण्यात आलं. मी तेही विसरलो. राष्ट्रवादीने आमचं वाटोळं केलं आहे. यातून बाहेर पडावं. आता स्वबळावर लढूया. हार पत्करावी लागली तरी चालेलं पण यातून बाहेर पडूया. शरद पवार यांनी ज्यांच्यासोबत युती केली त्यांचा पक्ष त्यांनी संपवला आहे. असे मी सांगितलं पण ते शक्य नसल्याचं पक्षप्रमुखांनी सांगितलं असेही ते म्हणाले.
शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, शरद पवार यांनी ज्यांच्यासोबत युती केली त्यांचा पक्ष त्यांनी संपवला. शरद पवार यांना २००९ मध्ये शिरुरमधून लढायचं होतं. २००९ मध्येचं महाविकास आघाडी होणार होती असा दावा त्यांनी केला आहे.


previous post