वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथील कंठीरवा स्टेडियमवर सुरू असलेल्या 2021 च्या ‘खेलो इंडिया’ आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत गुरुवारी पाचव्या दिवशी यजमान जैन विद्यापीठाने 14 सुवर्णपदकांची कमाई करत आपले वर्चस्व पदक तक्त्यात राखले. जैन विद्यापीठाच्या शिवा श्रीधरने जलतरण प्रकारात 7 सुवर्ण आणि 2 रौप्यपदकांची तसेच ऑलिम्पियन जलतरणपटू श्रीहरी नटराजने 3 सुवर्णपदके पटकाविली.
या स्पर्धेच्या पाचव्या दिवशी तिरंदाजी या क्रीडा प्रकारात अनेक धक्कादायक निकाल पाहावयास मिळाले. मुष्टियुद्ध आणि जलतरण हे दोन क्रीडा प्रकार संपुष्टात आले असून शनिवारी ऍथलेटिक्स या क्रीडा प्रकाराला प्रारंभ होईल. सदर स्पर्धेत देशातील 40 विद्यापीठांनी आपला सहभाग दर्शविला असून आतापर्यंत 89 सुवर्णपदकांची कमाई विविध खेळाडूंनी केली आहे.
जलतरण या क्रीडा प्रकारात यजमान जैन विद्यापीठाने आपले वर्चस्व राखले. या विद्यापीठाचा जलतरणपटू शिवा श्रीधर हा सर्वात दर्जेदार जलतरणपटू म्हणून ओळखला गेला. त्याने या क्रीडा प्रकारात 7 सुवर्ण आणि 2 रौप्यपदकांची कमाई केली. यापूर्वी झालेल्या खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सिद्धार्थ सेजवाल आणि साध्वी धुरी या जलतरणपटूंनी प्रत्येकी 5 सुवर्णपदकांची कमाई केली होती. या दोन्ही जलतरणपटूंचा विक्रम शिवा श्रीधरने मागे टाकला आहे. जैन विद्यापीठाचा ऑलिम्पियन जलतरणपटू श्रीहरी नटराजने 3 सुवर्णपदके विविध प्रकारात पटकाविली. त्याने पुरुषांच्या 100 मीटर फ्रिस्टाईल, 50 मीटर बॅकस्ट्रोक आणि 4ƒ200 मीटर फ्रिस्टाईल रिलेमध्ये हे यश संपादन केले. या तिन्ही क्रीडा प्रकारात मुंबई विद्यापीठाच्या शहाने रौप्य आणि कास्यपदके मिळविली.
तिरंदाजी या क्रीडा प्रकारात राणी दुर्गावती विश्वविद्यालयाच्या मुस्कान किरारची महिलांच्या एकेरी कंपाऊंड प्रकारात खराब कामगिरी झाली. तिला पात्रफेरीमध्ये शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले. गुरुनानक देव विद्यापीठाच्या स्नेह राणीने किरारचा 139-135 असा पराभव केला. पण पुढील फेरीत पंजाब विद्यापीठाच्या सुजाताने स्नेह राणीवर मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले. गतवषी या स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱया रागिणी मार्कोला उपांत्यफेरी गाठता आली नाही. त्याचप्रमाणे पुरुषांच्या विभागात पंजाब विद्यापीठाच्या कुलविंदरसिंग आणि संगमप्रित बिस्ला यांनी पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी पात्रफेरीमध्ये अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळविले. त्यानंतर बाद फेरीमध्ये कुलविंदरसिंगला शिवाजी विद्यापीठाच्या कुणाल शिंदेने 143-141 असे पराभूत केले. गुरुनानक देव विद्यापीठाच्या ऋतिक शर्माने संगमप्रित बिस्लाचे आव्हान पुढील फेरीत संपुष्टात आणले.
मुष्टियुद्ध या क्रीडा प्रकारात पुरुषांसाठी 13 तर महिलांच्या विभागात 12 सुवर्णपदकांसाठी लढती झाल्या. या क्रीडा प्रकारात महिलांच्या विभागात 26 विविध विद्यापीठांनी पदके मिळविली. रणबीरसिंग विद्यापीठाने या क्रीडा प्रकारात 2 सुवर्णपदकांची कमाई केली. पुरुषांच्या विभागात 11 विद्यापीठांनी 13 विविध वजन गटात पदके मिळविली. लोव्हेली प्रोफेशनल विद्यापीठाने 3 सुवर्णपदके पटकाविली.