श्रीहरी नटराज उपांत्य फेरीत, सायकलपटूंकडून निराशा
वृत्तसंस्था/ बर्मिंगहम
भारताचा अव्वल बॉक्सर शिवा थापाने राष्ट्रकुल मोहिमेची शानदार सुरुवात करताना 63.5 किलो गटाच्या पहिल्या लढतीत पाकिस्तानच्या सुलेमान बलोचचा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये भारताच्या दोन्ही संघांनी विजय मिळविले तर जलतरणपटू श्रीहरी नटराज उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. सायकलपटूंकडून मात्र निराशाजनक कामगिरी झाली.
28 वर्षीय थापाला सुलेमानवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळविताना फारसे प्रयास करावे लागले नाहीत. या विजयासह त्याने लाईट वेल्टरवेट गटात उपउपांत्यपूवं फेरी गाठली आहे. पाचवेळचा आशियाई चॅम्पियनशिपमधील पदक विजेता असणाऱया थापाने तांत्रिकदृष्टय़ा सुलेमानपेक्षा खूप सरस खेळ केला. त्याने सुलेमानवर ठोशांचा भडिमार करीत त्याला नामोहरम केले आणि रिंगभर हालचाली करीत सुलेमानचे फटके चुकवत उत्तम बचाव केला. एकदा सुलेमान त्याच्यावर जोरदार ठोसा मारण्यासाठी पुढे सरसावला होता. पण थापा अचूक वेळी बाजूला झाल्याने तो कॅनव्हासवर पडला.
टेटे मध्ये पुरुष व महिलांची विजयी सुरुवात
टेबल टेनिस क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष व महिला दोन्ही संघांनी राष्ट्रकुलमध्ये विजयी सुरुवात केली. पुरुष संघाने बार्बाडोसवर तर महिला संघाने दक्षिण आफ्रिका संघावर 3-0 याच फरकाने मात केली.
गट 3 मध्ये दुबळय़ा बार्बाडोसविरुद्धच्या लढतीत हरमीत देसाई व जी. साथीयान यांनी केव्हिन फर्ली व टायरेस नाईट यांच्यावर 11-9, 11-9, 11-4 अशी सहज मात केली. नंतर अनुभवी शरथ कमलने रेमन मॅक्सवेलचा केवळ 15 मिनिटांत 11-5, 11-3, 11-3 असा धुव्वा उडवित भारताची आघाडी 2-0 अशी केली. तिसऱया सामन्यात जी. साथीयानलाही टायरेस नाईटवर 11-4, 11-4, 11-5 अशी मात करण्यासाठी फारसे श्रम घ्यावे लागले नाहीत.
महिलांमध्ये श्रीजा अकुला व रीथ टेन्निसन या जोडीने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या लैला एडवर्ड्स व दानिशा पटेल यांना 11-7, 11-7, 11-5 असे सहज हरविले. दुसऱया सामन्यात विद्यमान राष्ट्रकुल चॅम्पियन मनिका बात्राने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत मुस्फिक कलामचा 11-5, 11-3, 11-2 असा पराभव केला. मनिका ही राष्ट्रकुल टेटेमध्ये एकेरीचे सुवर्ण मिळविणारी पहिली भारतीय महिला आहे. शेवटच्या एकेरीत श्रीजा अकुलाने दानिशा पटेलवर 11-5, 11-3, 11-6 अशी मात करून भारताचा एकतर्फी विजय साकार केला.
श्रीहरी नटराज उपांत्य फेरीत
भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराजने पुरुषांच्या 100 मी. बॅकस्ट्रोकच्या प्राथमिक फेरीत 54.68 सेकंदाचा अवधी घेत उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळविली. 21 वर्षीय श्रीहरीने त्याच्या हीटमध्ये तिसरा व एकंदर पाचवा क्रमांक मिळविला. 53.77 से. ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी मात्र तो गाठू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेचा पीटर कोएत्झ हा या प्रकारातील सर्वात वेगवान जलतरणपटू ठरला. त्याने 53.91 से. वेळ नोंदवली.
भारताचा अनुभवी साजन प्रकाश व पदार्पणवीर कुशाग्र रावत यांना मात्र उपांत्य फेरीसाठी पात्र ठरता आले नाही. पुरुषांच्या 50 मी. बटरफ्लाय प्रकारात साजन प्रकाशने हीटमध्ये 25.01 से. वेळ नोंदवत आठवे स्थान मिळविले. सर्वोत्तम 16 जलतरणपटू पुढील फेरीसाठी पात्र ठरतात. पुरुषांच्या 400 मी. फ्रीस्टाईल प्रकारात कुशाग्रने 3ः37.45 से. वेळ नोंदवत शेवटचे स्थान मिळविले. या दोघांनाही आता दुसऱया प्रकारात खेळण्याची संधी मिळणार आहे. प्रकाश 100 व 200 मी. बटरफ्लायमध्ये तर कुशाग्र 1500 व 200 मी. फ्रीस्टाईलमध्ये भाग घेणार आहे.
ट्रक सायकलपटूंकडून निराशा
भारताच्या ट्रक सायकलिंग संघांपैकी एकाही संघाला पुढील फेरीत स्थान मिळविता आले नाही. पुरुषांच्या 4000 मी. परस्यूट संघात विश्वजीत सिंग, नमन कपिल, वेंकप्पा केंगलागुत्ती, अनंत नारायणन व दिनेश कुमार यांनी शेवटचे सहावे स्थान मिळविले. त्यांनी 4ः12.865 वेळ नोंदवली. न्यूझीलंड संघाने (3ः49.821) पहिले व इंग्लंडने (3ः50.798) दुसरे स्थान मिळवित सुवर्णपदकाच्या फेरीत स्थान मिळविले. ऑस्ट्रेलिया (3ः51.274) व वेल्स (3ः54.613) यांच्यात कांस्यपदकासाठी लढत होणार आहे. कॅनडाने पाचवे स्थान मिळविले.
स्प्रिंट प्रकारात भारतीय संघाने पात्रता फेरीत सहावे स्थान मिळविले. एल. रोनाल्डो, ई. डेव्हिड बेकहॅम व वाय. रोजित सिंग यांना पात्रतेची वेळ नोंदवण्यात अपयश आले. त्यांनी 44.702 से. वेळ नोंदवली. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांनी सुवर्णपदकाच्या फेरीत तर न्यूझीलंड व कॅनडा यांनी कांस्यपदकाच्या फेरीत स्थान मिळविले आहे. भारताच्या महिला संघालाही (51.433 से.) पात्रता मिळविण्यात अपयश आले. न्यूझीलंड व कॅनडा सुवर्णपदकासाठी तर वेल्स व ऑस्ट्रेलिया कांस्यपदकासाठी लढणार आहेत.