वृत्तसंस्था/ अमन (जॉर्डन)
आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताचा मुष्टियोद्धा शिवा थापाने विक्रमी सहावे पदक मिळविले. या स्पर्धेच्या इतिहासात सहा पदके मिळविणारा शिवा थापा हा भारताचा पहिला पुरुष मुष्टियोद्धा ठरला आहे.
रविवारी झालेल्या 63 किलो वजनगटातील सामन्यात शिवा थापाने दक्षिण कोरियाच्या मिनसू चोईचा 4-1 असा पराभव करत उपांत्यफेरीत स्थान मिळविले. या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 28 वषीय शिवा थापाने आपल्या जबरदस्त ठोशांच्या जोरावर दक्षिण कोरियाच्या चोईला जखमी केले. या गटात उपांत्यफेरीत प्रवेश मिळविल्याने शिवा थापाचे पदक निश्चित झाले आहे. आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेच्या इतिहासामध्ये शिवा थापाने 2013 साली सुवर्णपदक, 2017 आणि 2021 साली दोन रौप्यपदके, 2015 आणि 2019 साली दोन कांस्यपदके मिळविली आहेत. यावेळी त्याने या स्पर्धेत किमान कांस्यपदक निश्चित केले आहे.
आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताच्या अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एम. सी. मेरीकोमने आतापर्यंत सात पदकांची कमाई केली असून भारताच्या एल. सरितादेवीने विक्रमी आठ पदके मिळवली आहेत. जॉर्डनमधील या स्पर्धेत भारताच्या मोहम्मद हुसामुद्दिनने 57 किलो वजनगटात तर गोविंदकुमार सहानीने 48 किलो वजनगटात उपांत्यफेरीत प्रवेश मिळवून भारताची आणखी दोन पदके निश्चित केली आहेत. 57 किलो वजनगटात मोहम्मद हुसामुद्दिनने दक्षिण कोरियाच्या ली चा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. हुसामुद्दिनची पुढील फेरीतील गाठ सिरिक टेमिरेझाशी होणार आहे. मात्र, 54 किलो वजनगटात भारताच्या अनंत चोपडेला पराभव पत्करावा लागला. किर्गिस्तानच्या सेनझेआयने चोपडेचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. चोपडेने थायलंड खुल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.
महिलांच्या विभागात अनुक्षिता बोरोने 56 किलो वजनगटात, लवलिना बोरोगेनने 75 किलो वजनगटात उपांत्यफेरी गाठली आहे. मीनाक्षी, प्रीती आणि परवीन यांनीही आपल्या वजनगटातून उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला आहे. पुरुषांच्या विभागात भारताच्या नरेंद्र, नवीन कुमार, लक्ष्य चहर, सुमित आणि सचिन यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेमध्ये 27 देशांचे सुमारे 267 स्पर्धक सहभागी झाले आहेत.