शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला कबड्डी स्पर्धा: कोल्हापूरचे शहाजी कॉलेज उपविजेते
प्रतिनिधी,कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय महिला कबड्डी स्पर्धेत इस्लामपूरच्या के.आर.पी.कन्या महाविद्यालय संघाने अत्यंत अटीतटीच्या सामन्यात शहाजी महाविद्यालयाचा पराभव करून अजिंक्यपद पटकावले. येथील महावीर महाविद्यालयाच्या संयोजनाखाली राव ऍकॅडमीत ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.राजेंद्र लोखंडे,प्रा संभाजी पाटील यांच्या उपस्थितीत झाले.
शिवाजी विद्यापीठांतर्गत कोल्हापूर सातारा सांगली येथील प्रत्येकी प्रथम चार संघ असे एकूण बारा संघाने या स्पर्धेत भाग घेतला. अंतिम सामन्यात सुरुवातीस शहाजी महाविद्यालयाने कन्या महाविद्यालयावर वर्चस्व राखले पूर्वार्धात दहा गुणांनी पिछाडीवर असलेल्या कन्या महाविद्यालयाच्या संघाने उत्तरार्धात मात्र चढाई व क्षेत्ररक्षण यामध्ये जोरदार मुसंडी मारली.सरोजिनी पाटील,श्रद्धा माळी व पूजा शिंदे यांनी अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले.शेवटच्या काही मिनिटात त्यांनी पाच गुणांची आघाडी घेतली.शहाजी महाविद्यालयाच्या अंकिता चेचर,ऋतुजा लांडगे,निर्जला बोधे यांनी पराभव टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला,पण त्यांना यश आले नाही.
अखेर त्यांना तीन गुणांनी पराभव पत्करावा लागला.त्यामुळे त्यांना द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले.अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले संघाने आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज आष्टा संघावर एकतर्फी मात करून स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला.या स्पर्धेतून अमरावती येथे होणाऱया पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या महिला संघाची प्राथमिक निवड करण्यात आली.यासाठी ज्येष्ठ प्रशिक्षक,पंच डॉ.बाबासा उलपे डॉ.लीना पाटील व डॉ.संजय पाटील यांनी काम पाहिले.