-मंगळवारपर्यंत सर्व अभ्यासमंडळाचे उमेदवार ठरणार
-विद्यापीठ विकास आघाडीकडून गुरूवारी उमेदवारी अर्ज भरले जाणार
प्रतिनिधी,कोल्हापूर
Shivaji University Election 2022 : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विविध अधिकार मंडळासाठी 14 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 28 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे विद्यापीठ विकास आघाडीकडून मुलाखती घेवून अभ्यास मंडळाची यादी अंतिम केली. तर इतर अधिकार मंडळांच्या मुलाखती सुरू असून मंगळवारी अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ‘सुटा’ने आपल्या उमेदवारांचे नावे अंतिम केली आहेत. तर शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीने शनिवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून दोन दिवसात उमेदवार निश्चित केले जातील.
शिवाजी विद्यापीठ सिनेट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटना आणि संस्थाचालक यांच्याकडून इच्छुकांच्या मुलाखतीचे सत्र सुरू आहे. मुलाखतीमधून ताकदीच्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. सोमवारी सिनेट अॅकॅडमीक व सिनेट शिक्षकांची नावे विद्यापीठ विकास आघाडीकडून अंतिम केली जातील. तर बुधवारपर्यंत इतर अभ्यासमंडळाची नावे अंतिम करून गुरूवारी सर्व अभ्यासमंडळासाठी उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. विद्यापीठ विकास आघाडी कोअर कमिटीच्या बैठकीत मंगळवारपर्यंत जागा वाटप होवून उमेदवारांची नावे जाहीर केली जातील.
अधिक वाचण्यासाठी- शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुकीत ठाकरे गटाची शिवसेना उतरणार;संजय पवारांची घोषणा
विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीने घेतल्या मुलाखती
शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समिती व समविचारी विद्यार्थी संघटनांचे एक पॅनल आहे. त्यांनी शनिवारी पदवीधर मतदार संघासाठी 13 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. येत्या दोन दिवसात चर्चा करून ताकदीच्या उमेदवारांची निवड केली जाईल. या मुलाखती डॉ. प्रविण कोडोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रमुख मंदार पाटील, सम्राट शिंदे, ऋतुराज माने, अभिजित राऊत यांनी घेतल्या.