Tarun Bharat

चिपळुणात वाशिष्ठीसह शिवनदीचे पाणी पात्राबाहेर

Advertisements

पाणीपातळी वाढल्याने जुवाड बेटांवरील कुटुंबांचे स्थलांतर

प्रतिनिधी/ चिपळूण, रत्नागिरी, खेड

जिह्यात बुधवारी ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. प्रत्येक तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. सतत बरसणाऱया पावसामुळे चिपळुणात वाशिष्ठी व शिवनदीचे पाणी प्रथमच बाजारपूल, पेठमाप, भोगाळे, भाजी मंडई मागील परिसर, मिरजोळी, खेर्डी पात्राबाहेर वाहू लागले होते. पाणीपातळी वाढत चालल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मिरजोळीतील जुवाड बेटावरील कुटुंबांचे स्थलांतर केले. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह स्थानिक अधिकाऱयांनी नदी परिसराची पाहणी केली असून शिंदे यांनी प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या. तसेच खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मटण-मच्छीमार्केट पुन्हा पुराच्या विळख्यात अडकले. तर राजापुरात कोदवली व अर्जुना नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून पुराच्या शक्यतेने शहरातील व्यापारी सतर्क झाले आहेत. 

  आधीच हवामान विभागाने अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे जिल्हाभरात तुफान पाऊस कोसळला. यामुळे नदी-नाल्यांसह सर्व धबधबे ओसंडून वाहत आहेत. भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबईकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार, 13 ते 17 जुलै या कालावधीत जिह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

                      प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना

गेल्या आठवडय़ापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा जोर बुधवारीही कायम राहिला. परिणामी यावर्षीच्या पावसाळय़ात चिपळुणात वाशिष्ठी व शिवनदीचे पाणी त प्रथमच बाजारपूल, पेठमाप, भोगाळे, भाजी मंडई मागील परिसर, मिरजोळी, खेर्डी पात्राबाहेर वाहू लागले. पाण्याची पातळी वाढत चालल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मिरजोळीतील जुवाड बेटावरील कुटुंबांना स्थलांतरित केले आहे. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांसह स्थानिक अधिकाऱयांनी नदी परिसराची पाहणी केली असून शिंदे यांनी प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या. गतवर्षीच्या महापुराच्या पार्श्वभूमीवर वाढता पाऊस व वाढलेली नद्यांची पाणीपातळी लक्षात घेता नागरिक व व्यापारी सतर्क झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून येथे मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र वाशिष्ठी व शिवनदीतील काढलेल्या गाळामुळे वाशिष्ठी व शिवनदीच्या पात्राबाहेर पाणी आले नव्हते. मात्र बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. त्यामुळे बाजारपूल परिसरात एका बाजूला पाणी उलटले. त्यामुळे यातूनच वाहनांना मार्ग काढाला लागत होता. तसेच बाजारपुलालाही पाणी लागले असून दुसऱया बाजूलाही पाणी उलटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पेठमाप भागातील नदीकाठच्या काही घरांना पाणी लागले आहे. मिरजोळी जुवाड भागासह साई मंदिर जॅकवेल, साखरवाडी आदी भागात वाशिष्ठी नदीचे पाणी शेतात आले आहे. खेर्डी परिसरातही काही भागात नदीचे पाणी वर आले होते. शिवनदीचे पाणी मोठय़ा प्रमाणात भोगाळे परिसरातील मोकळय़ा जागांमध्ये आले होते. त्यामुळे येथे दरवर्षीप्रमाणे तलाव तयार झाले आहे. तसेच भाजी मंडई मागील शिंदे भाजीवाले परिसरातही पाणी पात्राबाहेर आले आहे. मात्र ते मुख्य रस्त्यावर आलेले नाही.

  नागरिकांसह व्यापारी सतर्क

बुधवारी एकंदरीत पावसाचा जोर व वाढलेली पाणीपातळी यामुळे प्रथमच ठिकठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने नागरिक व व्यापारी काहीसे धास्तावले. गतवर्षी जुलैमध्ये आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱयांनी दुकानांतील साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास सुरूवात केली होती. नागरिकही अधिक सतर्क झाले होते.

भोंगे वाजवले नाहीत, पण सातत्याने दिल्या जाताहेत सूचना

वाशिष्ठी व शिवनदीची पाणीपातळी गेल्या काही दिवसांचा विचार करता वाढली असली तितकासा धोका निर्माण झालेला नाही. त्यामुळे एकदाही भोंगे वाजवण्यात आलेले नाहीत. मात्र पब्लिक ऍडेस सिस्टीमव्दारे नागरिक व व्यापाऱयांना सातत्याने सतर्कतेच्या सूचना केल्या जात आहेत. त्याचा फायदा होत आहे.

अतिरिक्त जिल्हाधिकारी शिंदे चिपळुणात

बुधवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे येथील दौऱयावर आले आहेत. त्यांनीं प्रथम अधिकाऱयांची तहसीलदार कार्यालयात बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच अलर्ट राहण्याच्या अधिकाऱयांना सूचना केल्या. त्यानंतर बाजारपूल परिसराची प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्यासह पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी शिंगटे यांना परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या. मुख्याधिकारी शिंगटे यांनीही कार्यालय अधीक्षक अनंत मोरे यांच्यासह वाशिष्ठी नदीची ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली.V

एनडीआरएफ सज्ज

वाढता पाऊस व नद्यांची वाढलेली पाणीपातळी या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून येथे तैनात असलेली एनडीआरएफची तुकडी सज्ज झाली आहे. त्यांनीही बुधवारी शहरातील विविध भागांची पाहणी केली.

सायंकाळी पावसाचा जोर झाला कमी

बुधवारी दिवसाभर येथे मुसळधार पाऊस पडत होता. मात्र सायंकाळी पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे काही भागात शिरलेले नद्यांचे पाणी ओसरू लागले होते. बुधवारी 93.33 मि.मी तर आतापर्यंत 1511.1<8 मि.मी पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्यमापकावर झाली आहे.V

जुवाडवासिय अधिक सतर्क

यावर्षी जुवाडवासिय अधिक सतर्क झाले आहेत. ग्रामपंचायतीने त्यांच्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मात्र 12 कुटुंब यापूर्वीच भाडय़ाने घेतलेल्या घरांसह नातेवाईकांकडे स्थलांतरित झाली असून बुधवारी 2 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे 13 ही कुटुंब सुरक्षितस्थळी असून त्यांच्याकडून प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन होत असून ही चांगली बाब आहे.

जयराज सूर्यवंशी

तहसीलदार चिपळूण

प्रशासनाचा कायम संपर्क

गतवर्षी आलेल्या महापुरात जुवाडमधील अनेक कुटुंब अडकली होती. त्यामुळे यावर्षी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासन कायम आमच्या संपर्कात आहे. त्यांच्या सूचनांचे आम्ही पालन करीत आहोत. प्रशासनाने आमच्यासाठी मराठी शाळा सज्ज केली आहे. मात्र इतक्या लोकांना तेथे राहणे कठीण बनते. त्यामुळे आम्ही भाडय़ाच्या खोल्या घेतल्या असून यापूर्वीच तेथे काहीजण रहायला गेले आहेत. त्यामुळे भाडय़ाचे पैसे देण्याबाबत प्रशासनाने विचार करावा.

अनिल माळी

ग्रामस्थ जुवाड बेट, मिरजोळी

  खेडमध्ये व्यापाऱयांच्या उरात धडकी

खेडमध्ये बुधवारी पहाटेपासूनच कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे दुपारच्या सुमारास जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मटण-मच्छीमार्केट पुन्हा पुराच्या विळख्यात अडकले. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचे थैमान सुरूच राहिल्याने बाजारपेठेत पाणी घुसण्याच्या शक्यतेने व्यापाऱयांसह नागरिकांच्या उरात धडकी भरली. नारंगी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने सभोवतालचा परिसर जलमय झाला. गेल्या आठवडाभरापासून पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. सलग तीनवेळा मटण-मच्छीमार्केट पुराच्या पाण्यात अडकले. याशिवाय नारंगी नदीचेही पाणी सुर्वे इंजिनिअरींगनजीक घुसून खेड-दापोलीमार्गे वाहतुकीसाठी बंद झाला. बाजारपेठेत पाणी घुसण्याच्या शक्यतेने व्यापाऱयांची तारांबळ उडाली होती. 2 दिवसांपासूनही पूरस्थितीचा धोका निर्माण झाल्याने नदीकाठच्या रहिवाशांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या होत्या. बुधवारी जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडताच नगर प्रशासनाने तातडीने सायरन वाजवून नागरिकांना संपर्क केले. दुपारच्या सुमारास मटण-मच्छीमार्केट पुराच्या पाण्यात अडकताच नजीकच्या व्यापाऱयांची त्रेधातिरपीटच उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती.

जगबुडी नदीपात्रात 5 गुरे अडकली

धो-धो कोसळणाऱया पावसामुळे ओसंडून वाहणाऱया जगबुडी नदीपात्रात बुधवारी सायंकाळच्या सुमारास 6 गुरे अडकली. ही बाब काही जागरुक नागरिकांच्या निदर्शनास येताच तातडीने प्रशासनास कळवण्यात आले. तातडीने घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल झाले. या जनावरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते.

Related Stories

कोरोना बाधीतांची संख्या 287

Patil_p

रोटरी क्लबच्या माध्यमातून मोफत चष्मे वाटप

Anuja Kudatarkar

अधिकारी-ठेकेदारांच्या अकार्यक्षमतेमुळे विकासकामे रखडली

NIKHIL_N

रत्नागिरी : चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या अनुदानापासून संस्था वंचित!

Archana Banage

चिपळुणात 13 गुरे होरपळली, दोन मृत्यूमुखी

Patil_p

शाहू गव्हर्मेंट बँकेवर पुन्हा सत्तारूढ गटाचा झेंडा, १४ जागांवर विजय

Archana Banage
error: Content is protected !!