ऑनलाईन टीम/तरुण भारत
सातारा: छत्रपती संभाजीराजे यांनी आपली भूमिका मांडताना राज्यसभेच्या उमेदवारीतून काल माघार घेतली. मात्र त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याच्यावर टीका केली. हाच मुद्दा धरून विरोधी पक्ष नेत्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) , प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी महाविकास आघाडीवर टीकेचे झोड उठवले. दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle)यांनीही खरमरीत टीका केली आहे. सर्वांनी छत्रपती संभाजीराजेंचा ठरवून गेम केलाय. मात्र संपूर्ण राज्यातील युवक आणि मराठा समाज त्यांच्या मागं आहेत अशा शब्दात खडेबोल सुनावले आहेत. साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात बोंडारवाडी धरणाबाबत (Bondarwadi Dam) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते.
संभाजीराजेंच्या मागे मोठा जनसमुदाय
यावेळी ते म्हणाले, छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) हे आमच्या छत्रपती कुटुंबातील आहेत. मी त्यांच्यापेक्षा छोटा आहे. संभाजीराजें यांचे मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा आरक्षण (Maratha Reservation)यामध्ये फार मोठं काम आहे. त्यांनी समाजाला एकत्र ठेवण्याचं काम केलंय. यावेळी त्यांची खासदारकी गेली असेल, पण योग्य वेळी काय निर्णय घ्यायचा ते पारखून निर्णय त्यांनी घ्यावा, असं त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे यांच्यामागं मोठा जनसमुदाय आहे. संपूर्ण राज्यातील युवक आणि मराठा समाज त्यांच्या मागं आहेत. मात्र राज्यसभेची (Rajya Sabha Election)उमेदवारी देताना त्यांचा सर्वांनी ठरवून गेम केलायं अशी मविआवर टीका त्यांनी केली.
संभाजीराजेंना मदत करा
मराठा समाजातील कोणी माणूस पुढं जात असेल, तर आपण त्यांचे पाय ओढत असतो. त्यामुळं अशी भूमिका न घेता संभाजीराजेंना भविष्यात कशी मदत होईल, याचा विचार करावा असेही ते म्हणाले. मराठा समाजाला आवाहन करताना ते म्हणाले, संभाजीराजेंचे मराठा समाजासाठी फार मोठं योगदान आहे. संभाजीराजेंनी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेशात मराठा समाजात जागृती केली आहे. समाजाला एकत्र ठेवण्याचं काम केलं. त्यांच्या पुढील कारकिर्दीत मराठा समाजानं त्यांच्यासोबत रहावं. समाजासाठी स्थापन केलेल्या सकल मराठा संस्थेनंही त्यांच्या पाठीशी राहावं असे आवाहन त्यांनी संपूर्ण मराठा समाजाला केलं आहे.