सर्वेक्षणाचे व्हिडीओ चित्रण प्रसारित, जिल्हा न्यायालयात सुनावणी 4 जुलैला
वाराणसी / वृत्तसंस्था
वाराणीतील काशीविश्वेश्वराच्या मंदिरातील ज्ञानवापीच्या तलावात सापडलेले शिल्प हे शिवलिंगसदृशच असल्याचे आता स्पष्ट होत आहे. या सर्वेक्षणाचे व्हिडीओ चित्रण सोमवारी वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आले आहे. त्यात या तलावाच्या आतील भागात शिवलिंगासारखाच आकार असणारे शिल्प दिसून येत आहे. या प्रकरणातील हिंदू पक्षकारांनी हे शिवलिंगच असल्याचे प्रतिपादन केले असून मुस्लीम पक्षकारांनी मात्र तो कारंजा असल्याचा दावा केला आहे.
ज्ञानवापी ही मशीद नसून ते मंदिरच आहे, असे हिंदू पक्षाचे प्रतिपादन आहे. तसेच या परिसरातील श्रृंगारगौरी या स्थानी नित्य पूजा करण्याचा अधिकार हिंदूंना द्यावा, अशी मागणी करणारी याचिका चार हिंदू महिलांनी सादर केली होती. ती सादर करुन घेऊन न्यायालयाने या संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण आणि व्हिडीओ चित्रण करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार 13, 14 आणि 15 मे या तीन दिवसांमध्ये हे सर्वेक्षण आणि व्हिडीओ चित्रण पूर्ण करण्यात आले होते. तसेच यासंबंधीचा सविस्तर अहवालही न्यायायाला सादर करण्यात आला होता.
या व्हिडीओ चित्रणाचा काही भाग आता प्रसारित करण्यात आला आहे. विशेषतः ज्ञानवापी परिसरातील तलावाचे व्हिडीओ चित्रण करत असतानाचे हे चित्रण आहे. तलावात पाणी भरलेले असताना त्यातील शिल्प स्पष्ट दिसत नव्हते. म्हणून पाणी काढण्याचा आदेश देण्यात आला. तलावतील पाणी काढल्यानंतर त्यातील या शिल्पाचे स्पष्ट दर्शन होत आहे. हे शिल्प प्रथमदर्शनी एक मोठे शिवलिंगच असल्याचे जाणवते, असे मत अनेक तज्ञांनीही व्यक्त केले आहे.
भिंतींवर त्रिशूळांची चित्रे
ज्ञानवापी परिसरात असलेल्या मशीदीच्या आतील भागातील भिंतीवर त्रिशूलांच्या आकृत्या कोरलेल्या असल्याचेही या व्हिडीओ चित्रणात दिसत आहे, असे प्रतिपादन करण्यात आले आहे. हे संपूर्ण व्हिडीओ चित्रण अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मशीदीच्या आतल्या भागात हिंदू देवतेवतांची कोरीव चित्रे, कमलपुष्पाची चित्रे, स्वस्तिक हे हिंदूंचे धर्मचिन्ह, भग्नावस्थेतील शेषनागाचे शिल्प, भग्नावस्थेतील काही हिंदू मूर्ती अशी अनेक साधने आढळून आलेली आहेत. या साधनांवरुन येथे हिंदूंचा देव शिवशंकराचेच मंदिर होते, हे स्पष्ट होत असल्याचे प्रतिपादनही पुरातत्व तज्ञांकडून केले जात आहे. मात्र, यासंबंधी अधिक स्पष्टता हे संपूर्ण चित्रण प्रसिद्ध झाल्यानंतरच येईल, असेही मत व्यक्त होत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरच हे संपूर्ण चित्रण प्रसिद्ध केले जाऊ शकणार आहे. तोपर्यंत प्रतीक्षा करावी, असेही मत आहे.
जिल्हा न्यायालयात 4 जुलैला सुनावणी
मध्यंतरीच्या काळात हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहचले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने करावी असा आदेश दिल्याने ते जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आलेले आहे. सोमवारी या न्यायालयात सुनावणी झाली. पुढील सुनावणी 4 जुलैला होणार आहे. या सर्वेक्षणाचे व्हिडीओ चित्रण प्रसिद्ध करण्यास अनुमती देऊ नये, असा मुस्लीम पक्षाचा आग्रह आहे. तर हे चित्रण प्रसिद्ध करावे. तसे केल्यास संशय दूर होईल, असे हिंदू पक्षकारांचे म्हणणे आहे.
मुस्लीम पक्षाचा युक्तिवाद
सोमवारी मुस्लीम पक्षकारांकडून युक्तिवाद करण्यात आला. हिंदूंनी सादर केलेला अभियोग कायदेसंमत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. आता न्यायालयाला उन्हाळी सुटी लागणार असल्याने सुनावणी 4 जुलैपर्यंत पुढे नेण्यात आली आहे. 4 जुलैला मुस्लीम पक्षकार त्यांचा पुढचा युक्तिवाद करतील. त्यानंतर हिंदू पक्षकार त्यांचा पक्ष न्यायालयासमोर मांडतील, अशी माहिती देण्यात आली.
व्हिडीओ चित्रणावरुन काय कळते ?
ड जे चित्रण प्रसिद्ध झाले आहे, त्यावरुन शिवलिंगसदृष शिल्पाचे दर्शन
ड मशीदीच्या आतील भागांमध्ये हिंदू मंदिरांच्या अनेक चिन्हांची दृष्ये
ड हिंदू पक्षकार आणि मुस्लीम पक्षकार यांचे परस्परविरोधी प्रतिपादन