सोलापूरचा महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी
फिरोज मुलाणी/ पुणे
क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा.. खचाखच भरलेले मैदान… कडाडणारी रणहलगी.. अशा उत्साही वातावरणातील थरारक लढतीत पुण्याच्या शिवराज राक्षे याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला दुहेरी पट काढून मानेवर कस चढवीत प्रतिष्ठेचा महाराष्ट्र केसरी किताब जिंकला. या लढतीत चितपटीने विजय मिळवून त्याने इतिहास रचला. शिवराजच्या विजयामुळे पुणे जिह्यातील कुस्तीशौकिनांनी जल्लोष केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवराजला मानाची महाराष्ट्र केसरीची गदा प्रदान करण्यात आली. याचवेळी फडणवीस यांनी राज्यातील यशस्वी मल्लांना भरघोस मदत देण्याच्या दृष्टीने मानधन वाढीच्याही घोषणा केल्या.
स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत अस्थायी समितीच्या मान्यतेने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री गिरीश महाजन, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषणसिंग, सचिव विनोद तोमर, खासदार रामदास तडस, आयोजक मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, हिंदकेसरी योगेश दोडके, संदीप भोंडवे यांच्या उपस्थितीत अंतिम लढत बरोबर 7 वाजून 42 मिनिटांनी लावण्यात आली.
मूळचा पुणे येथील मात्र नांदेडचे प्रतिनिधित्व करणारा शिवराज आणि सोलापूरचा महेंद्र दोघेही समान उंचीचे आणि बलदंड ताकदीचे होते. दररोज तालमीत बरोबर सराव करणारे सहकारी आज मानाचा किताब जिंकण्यासाठी समोरासमोर उभे ठाकले. शिवराज लाल जर्सीत तर महेंद्र निळ्या जर्सीत लढत होता. सलामी झाल्यावर दोघांनी ताकदीचा अंदाज घेतला. मात्र पंचांनी आक्रमक लढण्याची सूचना दिली. आक्रमक झालेल्या शिवराजचा शिवराजचा दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न महेंद्रने अपयशी ठरवला. बचावात्मक पवित्र्यात लढणाऱया महेंद्रचा शिवराजने पुन्हा एकेरी पट काढून निर्णायक झटापटीत महेंद्र ताबा घेण्याचा प्रयत्न करीत असतानाच शिवराजने थेट दुहेरी पट काढून त्याला खाली घेतले. धोकादायक स्थितीत नेत मानेवर कस चढवीत चितपट करून विजयाला गवसणी घातली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अंतिम फेरीतील लढतीचा निकाल हा गुणावर लागतो. मात्र आज शिवराजने बेधडकपणे लढून थेट चितपटीने कुस्ती निकाली काढून जिंकली व नवा इतिहास रचला.
शिवराजला आजोबांपासून वारसा
शिवराज मूळचा राक्षेवाडी (ता. खेड जि पुणे) येथील असून आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. घरी आजोबांपासून घरात कुस्तीचा मोठा वारसा आहे. सामान्य शेतकरी कुटुंब असताना वडील संभाजी राक्षे यांनी शिवराजला कुस्तीत पाठबळ दिले. शिवराजने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 97 किलो गटात रौप्यपदक मिळवले आहे. तर वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत खुल्या गटात सुवर्णपदक मिळवले आहे. 2017 सालापासून तो महाराष्ट्र केसरी खुल्या गटात त्याची झुंज सुरू आहे. दुखापतीला सातत्याने सामोरे जावे लागत असल्याने शिवराजला अनेकवेळा मोठय़ा स्पर्धेला मुकावे लागले होते. या स्पर्धेत तो सुरुवातीपासून आत्मविश्वासाने आणि आक्रमकपणे लढला. आज प्रतिष्ठेचा किताब जिंकून वडीलांचे महाराष्ट्र केसरीचे स्वप्न साकार केले.
सांगोल्याच्या महेंद्रची तगडी लढत
सांगोला तालुक्यातील शिरसी येथील महेंद्रची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पाटी कोरी असल्याने कसलाही दबाव त्याने घेतला नाही. प्रतिकूल परस्थितीत आपल्यातील नैसर्गिक खेळाचे प्रदर्शन करून तो उद्दिष्ट गाठतो. धोकादायक मल्ल आणि धक्कादायक निकाल लावण्यात त्याची ख्याती आहे. कुस्तीचा मोठा वारसा त्याला घरातून लाभला आहे. चुलते काकासाहेब आणि नागा गायकवाड यांनी त्याला कुस्तीचे बाळकडू दिले. रावसाहेब आप्पा मगर यांनी त्याला कुस्तीचे धडे देऊन आकार देण्याचा प्रयत्न केला. पुढे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात अर्जूनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. जागतिक पदक विजेता राहुल आवारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार, सुनील लिम्हण, रणधीर पोंगल, शिवाजी कोळी, संदीप रासकर, शरद पवार यांनी त्याला पैलू पाडण्याचे काम केले. मातीत कसून सराव गादीवरील लढतीसाठी टेक्निक यामध्ये सातत्य राखल्याने दम आणि ताकदीमध्ये फरक पडल्याचे त्याने आवर्जून सांगितले.
भरपूर उंची आणि मजबूत देहयष्टी त्याला लाभली आहे. प्रत्यक्ष स्पर्धेत लढताना आत्मविश्वासाने तो प्रतिस्पर्ध्याचा मुकाबला करतो. मातीत लढताना हाताची सांड काढून घिस्सा मारणे, पुट्टी मारणे ही त्याची प्रमुख अस्त्रs आहेत. मात्र गादीवर गतिमान कुस्ती करावी लागत असल्याने एकरी पट काढणे शिवाय हप्ते भरून प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यावर त्याचा भर असतो. यंदा ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यावर त्याची घौडदौड कायम राहिली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतदेखील अनेकांना त्याच्या कामगिरीची दखल घ्यावी लागली. उपउपांत्य फेरीत शैलेश शेळके आणि अंतिम फेरीत अनुभवी सिकंदर शेखला पराभवाचा धक्का दिला आहे. पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने रौप्यपदकाची कमाई केली आहे.
आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात जल्लोष
महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी दोन्ही मानाचे किताब आज आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात सराव करणाऱया शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी पटकावले. दोन्ही मानाचे किताब मिळाल्यामुळे कुस्ती संकुलातील प्रशिक्षक आणि मल्लांच्या आनंदाला उधाण आले होते. कुस्ती संकुलातील मल्लांनी फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण करीत जल्लोष केला.
अंतिम फेरीत काका पवारांचे पट्टे
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल येथे अर्जूनवीर काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारे महेंद्र गायकवाड (सोलापूर), शिवराज राक्षे (नांदेड) यांच्यात चांगलीच रंगली. 2018 साली पुण्यात बालेवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतदेखील काकांचे पट्टे अंतिम फेरीत लढले होते याचीच पुनरावृत्ती आजच्या स्पर्धेत झाली.
गुरू उत्तमराव पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक पुण्याचे माजी महापौर हे पैलवान आहेत. कोल्हापूर येथील कसबा बावडा शासकीय कुस्ती केंद्रात त्यांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक उत्तमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले आहेत. स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन करताना आपल्या गुरुंना ते विसरले नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्तमराव पाटील यांना मानपत्र देऊन मुरलीधर मोहोळ यांनी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिष्याच्या आगळ्यावेगळ्या सन्मानाने पाटील सर भारावून गेले होते.