वार्ताहर /किणये
बेळगाव तालुक्यात सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या. शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन, अभिषेक असे कार्यक्रम झाले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह दिसून आला.
तालुक्याच्या बहुतांशी गावांमध्ये गावच्या प्रवेशद्वारांवर, अथवा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती निदर्शनास येतेच. शिवरायांप्रती अनेकांची निष्ठा आजही कायम आहे. बऱयाच गावांमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला.
मच्छे येथील अडीज वर्षाच्या चिमुकलीचा अनोखा मुजरा…
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले की, एक वेगळीच स्फूर्ती मिळते, उत्साह निर्माण होतो. शिवराज्याभिषेक सोहळा सर्वत्र सुरू असतानाच तालुक्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते मच्छे येथील अडीज वर्षाच्या बालिकेने. तिच्या शिवभक्तीचा व्हिडिओ सर्वत्र वायरल झाला होता. ऋत्वी गजानन जैनोजी असे त्या चिमुकलीचे नाव आहे. घरातूनच शिवरायांबद्दल तिला माहिती मिळत गेली. यामुळेच तिने सोमवारी राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना वेगळ्य़ा पद्धतीने मानवंदना दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक केला. ती गेल्या वर्षभरापासूनच शिवरायांचे सर्व फोटो, प्रतिमा ओळखते. माहितीही देते. तिच्या या शिवभक्तीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. पाच नद्यांमधील पवित्र जल, दूध, तूप आदींनी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक केला. यावेळी ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र म्हणण्यात आले. पिरनवाडीतील असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.