ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेना नेमकी कोणाची? ठाकरे गटाची की शिंदे गटाची, यावर निवडणूक आयोगासमोर 12 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. 9 डिसेंबरपर्यंत दोन्ही गटांना आपापली लिखित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदेंनी 50 आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेना नेमकी कोणाची हा वाद सुरू झाला. हे प्रकरण न्यायालयात असतानाच अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. ठाकरे आणि शिंदे गटाला तात्पुरत्या स्वरुपात वेगवेगळी नावे आणि चिन्हे दिली. उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव देण्यात आलं. ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं.
अधिक वाचा : आम्ही उदयनराजेंच्या पाठीशी, त्यांना हतबल होऊ देणार नाही
दरम्यान, या प्रकरणात शिंदे आणि ठाकरे गटाला शिवसेना पक्षावर दावा सांगण्याकरिता पुरावे म्हणून सर्व कागदपत्रे सादर करण्याची मुदत निवडणूक आयोगाने दिली होती. 23 नोव्हेंबरपर्यंत ही मुदत होती, त्याला 9 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे महत्त्वाचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. दोन्ही गटांचे पहिल्यांदाच समोरासमोर युक्तिवाद करण्यात येणार आहेत. 12 डिसेंबरला निवडूक आयोगासमोर यासंदर्भातील सुनावणी होणार आहे. या सुनावणीत शिवसेना नेमकी कोणाची या प्रश्नावर पडदा पडू शकतो. त्यामुळे 12 डिसेंबर ही तारीख ठाकरे आणि शिंदे गटासाठी खूप महत्वाची मानली जात आहे.