ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी दिली नसल्याने शिवसेनेने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. परवानगी मागूनही पालिकेने निर्णय घेतला नसल्याची तक्रार करणारी रिट याचिका शिवसेनेने मुंबई महापालिका, महापालिका आयुक्त आणि जी-उत्तर वॉर्डचे सहायक आयुक्त यांच्याविरोधात दाखल केली आहे. तसेच यावर आजच हायकोर्टात सुनावणी व्हावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
येत्या 5 ऑक्टोबरला दसरा मेळावा आहे. दरवर्षी दादरमधील शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा घेतला जातो. मात्र, यंदा एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडले. दोन्ही गटाने पालिकेकडे शिवाजीपार्कवरील मैदानासाठी अर्ज केला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन पालिकेने कोणत्याही गटाला मेळाव्यासाठी मैदान उपलब्ध करुन दिले नाही. त्यानंतर दोन्ही गटांनी बीकेसीतील मैदानांसाठी अर्ज केला. शिंदे गटाला वांदे-कुर्ला संकुलातील बीकेसी मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे. तर बीकेसीच्या दुसऱ्या मैदानासाठी उद्धव ठाकरेंनी केलेला अर्ज मैदान आरक्षित असल्याने फेटाळण्यात आला आहे.
अधिक वाचा : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू
दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या हातात अगदी थोडाचवेळ शिल्लक आहे. पालिकेककडे परवानगी मागूनही त्यांनी कोणताही निर्णय न दिल्याने शिवसेनेने हायकोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. तसेच तातडीच्या सुनावणीची मागणी केली आहे.