मुंबई : प्रतिनिधी
लाऊडस्पीकर वादाचा धुरळा बसण्याआधीच शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून एकमेकांवर टिका होत आहे. राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला जाणार आहेत, तर महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे १० जूनला देशभरातील शिवसेना कार्यकर्त्यांसह अयोध्येला जाणार असून दोघेही राम मंदिराला भेट देणार आहेत.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यावर सडकून टीका केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना उद्देशून संजय राउत म्हणाले की “प्रभू राम त्यांच्याकडे खोट्या भावनांनी आणि राजकीय उद्देश घेऊन येणाऱ्यांना आशीर्वाद देत नाहीत”.