शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) रत्नागिरी दौऱ्यावर असून त्यांची खेड येथील गोळीबार मैदानात जाहीर सभा झाली. निवडणुक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्यावर उद्धव ठाकरे यांची ही पहीलीच जाहीर सभा असल्याने राजकीय लोकांचे या सभेकडे लागले होते. खेड मधून बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गट, भाजप आणि निवडणुक आयोग यांच्यावर जोरदार टिका केली. निवडणुक निर्णयाचा निकाल आम्हाला मान्य नाही असे सांगून ज्यांचा भारतीय स्वातंत्र्याशी कोणताही संबंध नाही ते आज सत्तेवर असल्याचे उद्धव ठाकरे यांनी टिका केली.या सभेत संजय कदम यांनी ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केला. संजय कदम यांच्या बरोबरच अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या हाती शिवबंधन बांधले.
आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले, “हा चुनाव आयोग नाही तर चुना लगाव आयोग आहे. निवडणुक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य़ नाही. शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केली निवडणुक आयुक्तांच्या वडिलांनी नाही. त्यामुळे निवडणुक आयोगाने चोमडेपणा करू नये. या अगोदर भाजपला गल्लीतील कुत्रे विचारत नव्हते. पण शिवसेनेच्या जोरावर त्यांनी देशाचे राजकारण केले.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “या गद्दार ढेकणांना चिरडण्यासाठी बोटाने मतदान करा. शिवसेना ही आमची आई आहे ती नसती तर हे कोण होते? बंडखोरांनी स्वताच्या आईवडिलांचे नाव लावून पक्ष उभारून पहावा. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात उद्योगधंदे येत होते. पण सध्याचे मुख्यमंत्री गप्प का आहेत. कर्नाटकच्य़ा मुख्यमंत्र्यानी डोळे वटारल्यावर हे गप्प का ?” असा सवाल त्यांनी केला.
तसेच “संपुर्ण महाराष्ट्र माझे कुटुंब आहे. मी घरी बसून जो महाराष्ट्र सांभाळला तो तुम्हाला फिरूनही सांभळता येत नाही. महाराष्ट्रातील सगळे उद्योगधंदे गुजरातमध्ये गेले. अलीकडेच आयफोन तयार करणारा उद्योगसमुह कर्नाटकात गेला. हाच का गतीमान महाराष्ट्र ?”
शेवटी बोलताना त्यांनी भाजपवर टिकेचा सुड ओढला, “काळी टोपीवाल्यांनी महामानवांचा अपमान केला. भाजपच्या व्यासपीठावर अगोदर साधू होते आता संधीसाधू असतात. भाजपच्या मते तुम्ही विरोधी पक्षात असाल भ्रष्टाचारी ठरता. ज्यांचा स्वातंत्र्याशी काडीमात्रीचा संबंध नाही ते आज सत्तेवर असून लोकशाही धोक्यात आहे. महाराष्ट्रात फक्त मोदिंचा फोटो वापरून मते मागून दाखवा….बाळासाहेबांच्या फोटो शिवाय निवडणुक लढवून दाखवा.” असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले.