धावत्या शिवशाही बसचे अचानक पुढील चाक निखळल्याचा प्रकार आज सकाळी चिपळूण वालोपे नजीक घडला. सुदैवाने बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले. या प्रकाराने बसमधील प्रवाशांनी गुहागर आगाराच्या गलथान कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे.
गुहागर आगाराची आज रविवारी सकाळी 11 वाजता ठाणे शिवशाही बस गुहागरमधून रवाना झाली. ही बस दुपारी १२.३० च्या सुमारास चिपळूण वालोपे येथे आली असताना धावत्या बसचे पुढील चाक अचानक निखळले. त्यामुळे बस एका बाजूला झुकली. प्रसंगावधान राखून चालकाने बसमधून उतरुन लगेच प्रवाशांनाही बाहेर काढले.
समांतर रस्ता असल्याने बसला कोणताही धोका पोहचला नाही त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, पुढील परशुराम घाटात हा प्रकार घडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी भीती काही प्रवाशांनी व्यक्त केली. यानंतर प्रवाशांना पर्यायी बसही उपलब्ध करुन देण्यात आली नाही. त्यातच रविवारी मुसळधार पाऊस असल्याने बसमधील उतरलेल्या प्रवाशांना या त्रासाला सामोरे जावे लागले.

