चित्ररथ मिरवणूक उत्साहात : शिवप्रेमींचा एकच जल्लोष : मर्दानी खेळांनी डोळय़ांचे पारणे फेडले
प्रतिनिधी /बेळगाव
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वडगावात मंगळवारी भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. दोन वर्षांनंतर ऐतिहासिक आणि वैभवशाली चित्ररथ मिरवणुकीत आबालवृद्धांचा अमाप उत्साह दिसून आला. दरम्यान, मावळय़ांनी हाती घेतलेले भगवे ध्वज, मराठमोळी वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, नेत्रदीपक रोषणाई आणि आकर्षक चित्ररथ देखाव्यांमुळे वडगावात शिवसृष्टी अवतरली होती. पारंपरिक पद्धतीने शिवप्रेमींच्या उत्साहात आणि जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात यंदाच्या चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात झाली.
प्रारंभी वडगाव येथील शिवयोग मंडळातर्फे पाटील गल्लीत उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाचे अध्यक्ष नेताजी जाधव, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, भाजप नेते किरण जाधव, जि. पं. माजी सदस्य रमेश गोरल, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, वर्षा आजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन आणि गाडय़ाचे पूजन झाले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहात चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ झाला. शिवाय चित्ररथांसमोर लाठीमेळा, ढाल, तलवार, दांडपट्टा, झांजपथक आदी मर्दानी खेळांनी शिवप्रेमींच्या डोळय़ांचे पारणे फेडले.
यावेळी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील तेजोमय घटनांवर आधारित चित्ररथ आणि जिवंत देखावे सादर झाले. देखाव्यात सहभागी झालेल्या कलाकारांनी हुबेहुब शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मावळे, अफझलखान, औरंगजेब यांच्या भूमिका साकारत उत्कृष्ट सादरीकरण केले.
शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंग जिवंत देखाव्यांद्वारे सादर झाले. दरम्यान, भगवे फेटे, भगव्या टोप्या आणि भगव्या झेंडय़ांमुळे खरीखुरी शिवशाही अवतरली होती. याबरोबरच पारंपरिक मराठमोळी वेशभूषाही पाहायला मिळाली.
वडगाव परिसरातील विष्णू गल्ली, पाटील गल्ली, वझे गल्ली, सोनार गल्ली, रामदेव गल्ली, कारभार गल्ली, नाझर कॅम्प, बाजार गल्ली, सपार गल्ली, भारतनगर आदी परिसरात जल्लोषात चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, भाऊराव पाटील, अध्यक्ष सोमनाथ पाखरे, उपाध्यक्ष प्रसाद जुवेकर यासह बहुसंख्येने शिवभक्त, महिला, आबालवृद्ध सहभागी झाले होते.
अनगोळ येथे शिवजयंती मिरवणूक उत्साहात
अनगोळ येथील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने बाप्पा ढोल-ताशा पथकाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी टिळकवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार आणि उद्यमबाग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे, उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळू पवार, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, प्रफुल्ल सोमनाचे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेवच्या जयघोषात ही मिरवणूक काढण्यात आली. मराठी शाळा क्रमांक 34 पासून मिरवणूक सुरू करण्यात आली. यावेळी ढोल पथकाचे पूजन परशराम ताशिलदार यांच्या हस्ते करण्यात आले. अनगोळमध्ये फिरून महात्मा गांधी स्मारक येथे मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी शिवप्रेमी आणि अनगोळ गावातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.