अजिंक्यतारा पायथ्याच्या चौकाला छत्रपती शाहू चौक नामकरण
प्रतिनिधी/ सातारा
शिवतीर्थ हे साताऱयाचे महत्वाचे ठिकाण आहे. या परिसरात पालिकेकडून परवानगी घेऊन वा विनापरवाना कोणीही कसेही फ्लेक्स लावून परिसराला अवकळा आणत होते. त्याबाबत शिवभक्तांकडून अनेकदा पालिकेकडे तक्रारी झालेल्या आहेत. अनेक आंदोलने झाली होती. त्याअनुषंगाने सातारा पालिकेने शिवतीर्थावर नो फ्लेक्स झोन करण्याचा विषय मंजूर केला. त्याचबरोबर सोनगाव कचरा डेपो, गोरक्षण बोळ येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह तब्बल 183 विषयांना मंजुरी दिली. दरम्यान, अजिंक्यताऱयाच्या पायथ्याला येणाऱया पहिल्या चौकास छत्रपती शाहू चौक हे नाव देण्याच्या ठरावास मंजुरी दिली.
सातारा पालिकेची प्रशासकीय सभा मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्य अभियंता दिलीप चिद्रे, आरोग्य विभागाचे प्रमुख प्रकाश राठोड, अतिक्रमण हटावचे प्रशांत निकम, स्थावर जिंदगीचे सतीश साखरे, वसुलीचे प्रशांत खटाव, अतुल दिसले, पाणी पुरवठय़ाचे अभियंता शहाजी वाठारे, दिग्विजय गाढवे, बांधकामचे अभियंता सुधीर चव्हाण, विश्वास गोसावी, वृक्ष विभागाचे प्रणव पवार, महिला राजस्व अभियानाच्या किर्ती साळुंखे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. यावेळी विषय वाचन अतुल दिसले यांनी केले. या सभेपुढे 184 विषय अजेंडय़ावर ठेवले होते. त्यामध्ये शाहूनगर भागातील रस्त्याचा विषय दुबार आल्याची बाब अभियंता सुधीर चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर एक विषय कमी केला.
दरम्यान, शिवतीर्थ येथे नो फ्लेवस झोन करण्याचा ठराव मंजूर केला. त्याचबरोबर शहरात वाढीव हद्दीसह खाजगी मिळकतीमध्ये नव्याने उभारलेल्या होर्डिंगवर जाहिरात कर आकारणी करण्यात येणार आहे. तसेच विनापरवाना लावण्यात येणाऱया जाहिरात फलकावर सेवाशुल्क म्हणून 10 हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. किल्ले अजिंक्यताऱयावरुन येणाऱया रस्त्याच्या पहिल्या चौकास छत्रपती शाहू महाराज चौक असे नाव देण्याच्या ठरावास मंजुरी दिली. त्याचबरोबर शहरातील रस्ते, गटर या कामांसाठी मंजुरी देण्यात आली. सोनगाव कचरा डेपो व गोरक्षण बोळ येथेही सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे, आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान अन् माझी वसुंधरा अभियानावर भर
सातारा शहरामध्ये विशेष करुन स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्यासाठी विषय घेतले गेले आहेत. माझी वसुंधरा अभियानाचे विषय घेतले गेले आहेत. त्यामध्ये अनेक विषय आहेत. त्यामुळे आता प्रभावीपणे काम होणार आहे. त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱयावर कारवाई करण्यासाठी एका संस्थेकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अतिरिक्त कर्मचाऱयांचे विषय मंजूर
वसुली मोहीम अधिक गतिमान करण्यासाठी तीन कार्यालयीन सहाय्यक पुरवण्यासाठी 2 लाख 68 हजार 800 रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. वृक्ष विभागात कंत्राटी कर्मचाऱयांची नियुक्ती करण्याचा विषय घेण्यात आला. तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत सीटी को ऑर्डिनेटर असलेला विशाल सुर्वे यास मुदतवाढ देणे व 1 डिसेंबर 2022 पासून नितीन माळवे यांची नियुक्ती केली. तसेच पालिकेच्या विविध विकासकामांवर देखरेख करण्यासाठी आठ कनिष्ठ अभियंता, तांत्रिक कर्मचारी पुरवठा करण्यासाठी अर्थव एंटरप्राईज या कंपनीला काम देण्याचा ठराव मंजूर केला.
शिक्षण मंडळाचे कार्यालय हलवण्यासाठी तब्बल 2 लाख 45 हजार रुपयाची तरतूद
सातारा पालिका शिक्षण मंडळाचे कार्यालय सध्या पालिकेच्या इमारतीत आहे. तेथून ते गुरुवार पेठेतल्या शाळा क्रमांक 8 मध्ये हलवण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 2 लाख 45 हजार 572 रुपयांची तरतूद केली आहे. मुळात नव्याने पालिकेच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. तेथे कालांतराने सर्व कार्यालये जाणार आहेत. असे असताना आताच शिक्षण मंडळाचे कार्यालय हलवण्यात का घाई केली, याबाबत मात्र प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच शिक्षक दिनाच्या कार्यक्रम घेण्यासाठी व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळय़ासाठी तरतूद करण्यात आली आहे.