पोलिसांकडून हल्लेखोराला कंठस्नान ः कॅनडात घडली घटना
वृत्तसंस्था/ लँग्ली
कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील लँग्ली शहरात अनेक ठिकाणी झालेल्या गोळीबारात दोन नागरिकांना जीव गमवावा लागला तर दोन जण जखमी झाले आहेत. तर पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोर मारला गेला आहे.
व्हँकुव्हरनजीक लँग्ली शहरात एका हल्लेखोराने बेघर लोकांना लक्ष्य केले. हल्लेखोराने चार जणांवर गोळय़ा झाडल्या, यातील दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक पुरुष आणि एक महिला गंभीर जखमी झाली. यातील महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हल्लेखोराने प्रथम कॅसिनोनजीक रात्री सुमारे 12 वाजता, त्यानंतर पहाटे 3, 5 वाजता आणि 5.45 वाजता नागरी इमारत, बस स्टॉप आणि महामार्गावर गोळीबार केला. याचबरोबर हल्लेखोराने मॉलनजीकही गोळीबार केला आहे. ही सर्व ठिकाणी परस्परांपासून काही किलोमीटर अंतरावर आहेत.
विलोबुक मॉलनजीक हल्लेखोर पोलिसांच्या कारवाईत मारला गेला. मॉलनजीक पोलिसांना एक वाहन आढळून आले आहे. कॅनडा पोलिसांनी सद्यस्थितीत हल्लेखोर तसेच मारले गेलेल्या नागरिकांची ओळख उघड करण्यास नकार दिला आहे. सर्वप्रथम मृतांच्या कुटुंबीयांना यासंबंधी माहिती दिली जाणार आहे. त्यानंतरच त्यांच्या नावांचा खुलासा केला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.