कारमधून गोळीबार करत होते हल्लेखोर
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये सोमवारी दुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 10 जण जखमी झाले आहेत. ही घटना फ्लोरिडाच्या लेक लँड भागात घडली आहे. एका निळय़ा रंगाच्या कारमधून हल्लेखोर आले होते अशी माहिती पोलीस प्रमुख सॅम टेलर यांनी दिली आहे. घटनास्थळी पोहोचताच हल्लेखोरांनी खिडक्यांच्या काचा खाली करत गोळीबार सुरू केला होता. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
काही लोकांना लक्ष्य करत हा गोळीबार करण्यात आल्याचे पोलिसांचे मानणे आहे. हल्लेखोर अत्यंत वेगाने कार चालवत असताना त्यांना रोखता आले नाही. घटनास्थळावरून मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. लेक लँड भागात गोळीबाराची घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती असे टेलर यांनी म्हटले आहे.