दोघे जखमी : सशस्त्र नागरिकाच्या प्रत्युत्तरात हल्लेखोर ठार
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या इंडियाना प्रांतात एका मॉलमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. एका सशस्त्र नागरिकाच्या प्रत्युत्तरात हल्लेखोर मारला गेला आहे. तर गोळीबाराच्या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ग्रीनवुड पार्क मॉलमध्ये ही घटना घडली आहे. एका इसमाने मॉलच्या फूड कोर्टमध्ये शिरून अंदाधुंद गोळीबार सुरू केला, त्यानंतर मॉलमध्ये असलेल्या एका अन्य नागरिकाने हल्लेखोरावर गोळी झाडली होती. यात हल्लेखोराचा मृत्यू झाल्याचे पोलीस अधिकाऱयाने सांगितले.
इंडियानापोलिसपासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर हा मॉल आहे. तेथे 130 हून अधिक इनडोअर आणि आउटडोअर रेस्टॉरंट्स तसेच दुकाने आहेत. गोळीबाराच्या या घटनेत एकूण 4 जणांना जीव गमवावा लागला आहे. फूड कोर्टनजीक एक संशयास्पद बॅग सापडली असून या पूर्ण प्रकरणी तपास केला जात असल्याचे पोलीस अधिकारी इसोन यांनी सांगितले.
प्रारंभिक तपासानुसार हल्लेखोरावर गोळी झाडणाऱया नागरिकाकडे हँडगन होती. इंडियाना प्रांतात हँडगन बाळगण्यावर काही निर्बंध आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक हँडगन बाळगू शकत नाहीत. हल्लेखोरावर गोळी झाडणाऱयाचे वय किती होते आणि त्याची पार्श्वभूमी आम्ही तपासत आहोत असे इसोन यांनी म्हटले आहे.
यापूर्वी 5 जुलै रोजी इंडियानामध्ये हॉलिडे पार्टीदरम्यान गोळीबार झाला होता. या घटनेत तिघांचा मृत्यु झाला होता. तर 4 जुलै रोजी शिकागो येथील फ्रीडम डे परेडदरम्यान झालेल्या गोळीबारात 7 जण मारले गेले होते.