ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात पुन्हा चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. या दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे काश्मीर झोन पोलिसांकडून सांगण्यात आले.
शोपियांच्या मुंझ भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहिम राबवली. मुंझ परिसरात संपूर्ण नाकाबंदी करुन शोधमोहिम तीव्र केली. यावेळी एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले.
काही दिवसांपूर्वीही शोपियां जिल्ह्यातील वाथू शिरमल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती.