Tarun Bharat

आरोग्य’मधील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

वैद्यकीय बिल मंजुरीसाठी पैशांची मागणी करण्याऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई : ‘तरुण भारत’च्या वृत्तानंतर जि.प.प्रशासक ऍक्शन मोडवर : खुलाशानंतर वादग्रस्त कर्मचाऱ्याची होणार बदली

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱयांचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी हजारो रुपयांची मागणी करणारा कर्मचारी आता प्रशासक संजयसिंह चव्हाण यांच्या निशाण्यावर आला आहे. सद्यस्थिती बिल मंजुरीसाठी पैसे मागणाऱ्या एक कर्मचाऱ्याबाबत आरोग्य कर्मचाऱयांची तक्रार असली तरी बिल मंजुरीची फाईलचा प्रवास ज्या टेबलवरून होतो, त्या चार कर्मचाऱयांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी कारणे दाखवा नोटीस लागू केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तक्रारीबाबत खुलासा केल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई होणार आहे. दरम्यान अनेक तक्रारी असणाऱया एक वादग्रस्त कर्मचाऱ्याची बदली होणार हे मात्र जवळपास निश्चित आहे.

‘जि.प.आरोग्य विभागास लाचखोरीचा आजार’ या मथळ्याखाली ‘तरुण भारत’मध्ये 6 ऑगस्ट रोजी वृत्त प्रसिद्ध झाले हेते. या वृत्ताची प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी गंभीर दखल घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांना संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वैद्यकिय बिलाची फाईल मंजूर करण्याऱया चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर कारवाईची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.

वैद्यकीय बिलाचा प्रस्ताव प्राथमिक आरोग्य केंद्रातून जि.प.तील जिल्हा आरोग्य विभागाकडे आल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे त्याला ब्रेक लागत आहे. त्यामुळे अनेक आरोग्य कर्मचारी वैद्यकीय बिल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पैशाची मागणी पूर्ण केल्यानंतरच त्याला गती मिळत असल्याचे चित्र आहे. एक परिपूर्ती बिलास मागणीनुसार रक्कम दिली तरच तुमचे बिल मंजूर केले जाईल अन्यथा नाही असे ठामपणे सांगितले जात असल्यामुळे कार्यालयाकडून केलेली मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून नाईलाजास्ताव पूर्ण केली जाते. पैसे देण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिल मागणीच्या प्रस्तावामध्ये त्रुटी काढल्या जातात. याबाबत ‘तरुण भारत’ मध्ये वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे अखेर खाबुगिरी करणाऱया कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे भिंग फुटले आहे.

‘तरुण भारत’चे विशेष आभार

काही वादग्रस्त कर्मचाऱ्यांमुळे जि.प.आरोग्य विभाग नेहमी चर्चेत राहिला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पगारातील विलंब असो, प्रलंबित वैद्यकीय बिलांचे प्रकरण असो, अथवा अन्य प्रशासकीय कामातील प्रलंबितता. या ठिकाणी काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना प्रत्येक कामात ‘अर्थ’ दिसत असल्यामुळे त्याची प्राप्ती होईपर्यंत कामातील दिरंगाई निश्चित असते. या लाचखोरी विरोधात ‘तरुण भारत’ने आवाज उठवल्यामुळे जि.प.प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे. प्रलंबित वैद्यकिय बिलांचा प्रश्नही आता तत्काळ मार्गी लागणार आहे. त्यामुळे संबंधित अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांकडून ‘तरुण भारत’चे विशेष आभार मानले जात आहेत.

Related Stories

राज्यस्तरीय शाहू मॅरैथॉनची तयारी पूर्ण

Abhijeet Shinde

इचलकरंजी पाणी योजनेला विरोध वाढला

Abhijeet Shinde

मेंढपाळांना स्थलांतरास विनाअट परवानगी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता जेरबंद

Abhijeet Shinde

रिक्षा चालकांच्या आर्थिक मदतीबाबत संभ्रमावस्था

Abhijeet Shinde

मलकापूर शहरातील त्या रुग्णांच्या संपर्कातील आलेली महिला पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!