भक्तांची लगबग : धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल : महादेव मंदिरांतून विशेष पूजा, अभिषेक, रुद्राभिषेकांचे आयोजन
बेळगाव : आजपासून श्रावणमासाला प्रारंभ होत असल्याने शहरातील शिवालये भक्तांसाठी सज्ज झाली आहेत. विशेषत: यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारीच होत असल्याने नागरिकांची विविध धार्मिक कार्यासाठी लगबग सुरू आहे. त्याबरोबरच यंदा भक्तांना पाच श्रावण सोमवार मिळणार आहेत. श्रावणमासात विविध शिवालयांतून पूजा, महापूजा, अभिषेक आणि इतर धार्मिक कार्यकर्मांची रेलचेल पाहावयास मिळणार आहे. श्रावण महिना पवित्र मानला जातो. त्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व दिले जाते. श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर शहरातील कपिलेश्वर मंदिर, मिलिटरी महादेव मंदिर, बिस्किट महादेव मंदिर, कणबर्गी सिद्धेश्वर मंदिर, देवरवाडी वैजनाथ मंदिर आदी मंदिरांतून भक्तांची गर्दी होणार आहे. विशेषत: यंदा दि. 5, 12, 19, 26 आणि 2 सप्टेंबर असे एकूण पाच सोमवार भक्तांसाठी मिळणार आहेत.
श्रावण सोमवारनिमित्त रविवारी बाजारात खरेदीची वर्दळ पाहावयास मिळाली. विशेषत: फुले, फळे आणि पूजेच्या साहित्याची खरेदी झाली. त्यामुळे बाजाराला श्रावणाचा बहर आल्याचे दिसून आले. याचबरोबर या महिन्यात वरदविनायक चतुर्थी, नागपंचमी, एकादशी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी आणि मंगळागौरी व्रत असे सण साजरे होणार आहेत. त्यामुळे बाजारपेठेत हळूहळू सणांसाठी फुलू लागली आहे. शहरातील महादेव मंदिरांतून दर सोमवारी विशेष पूजा, अभिषेक, रुद्राभिषेक आणि इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. काही ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महादेव मंदिरांवर विद्युत रोषणाई करून ती सजविण्यात आली आहेत. त्याबरोबरच दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात दर सोमवारी मूर्तीवर आरास केली जाणार आहे. एकूणच श्रावणासाठी शहरवासियांची लगबग वाढल्याचे दिसून येत आहे.
दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात आज विविध कार्यक्रम
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 4 रोजी रात्री 12 वाजता अभिषेक झाला. पहिला अभिषेक शहरातील जनतेच्या कल्याणासाठी कपिलेश्वर महादेव ट्रस्टच्यावतीने करण्यात आला. सोमवारी पहाटे विशेष रुद्राभिषेक झाला. श्रावण सोमवारनिमित्त त्रिकाल पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 वाजता भव्य पालखी प्रदक्षिणा होणार आहे. त्यानंतर महाआरती होईल. शिवाय श्रावणमासात भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिराच्या आवारात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. त्याबरोबरच मंदिरावर आणि मंदिराच्या अंतर्गत भागात विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. विनायक पालकर आणि सहकाऱ्यांनी सजावट केली आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुनील बाळेकुंद्री, विवेक पाटील, अजित जाधव, अविनाश खन्नूकर आदी ट्रस्टींनी केले आहे.