

क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
हुबळी येथे श्रेया प्रॉपर्टीज आयोजित श्रेया टी-20 चषक 35 वर्षावरील लिजेंड क्रिकेट स्पर्धेत हुबळी-धारवाड लिजेंड संघाने केआर शेट्टी बेळगाव लिजेंड संघाचा 8 गडय़ांनी पराभव करून श्रेया चषक पटकाविला. बेळगावच्या आदित्य खिलारेला मालिकावीर, प्रशांत लायंदरला उत्कृष्ट फलंदाज तर सादिक कित्तूरला उत्कृष्ट गोलंदाज पुरस्काराने गौरविण्यात आले.
हुबळी येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केआर शेट्टी किंग्स बेळगाव लिजेंड संघाने 20 षटकात 4 बाद 177 धावा केल्या. प्रशांत लायंदरने 2 षटकार 8 चौकारासह 65, आलिम माडिवालेने 41, शिवाजी पाटीलने 32, वीरेश गौडरने 23 धावा केल्या. हुबळी-धारवाडतर्फे शिवा नायकने 2 तर निलेश खिलारे, देवराज कोटी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळे-धारवाड लिजेंड संघाने 16.5 षटकात 2 बाद 180 धावा जमवित अजिंक्मयपद पटकाविले. निलेश खिलारेने आक्रमक फलंदाजी करत 6 षटकार 12 चौकारासह 105 धावा जमवित शतक झळकविले. शोहेब मॅनेजरने 43, मिलिंद चव्हाणने 16 धावा केल्या. बेळगावतर्फे नंदकुमार मलतवाडकर, अनंत माळवीने प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर धारवाड विभागीय क्रिकेट संघटनेचे समन्वयक अविनाश पोतदार, इस्माईल तमिटगार, सुजा मेहमूद, अनिल पाटील, व्हीटी करसण्णावर यांच्या हस्ते विजेत्या हुबळी-धारवाड लिजेंड संघाला तर उपविजेत्या केआर शेट्टी लिजेंड संघाला चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर व मालिकावीर निलेश खिलारे, उत्कृष्ट फलंदाज प्रशांत लायंदर, उत्कृष्ट गोलंदाज सादीक कित्तूर यांना चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.