वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीमध्ये भारताचा मध्यफळीतील फलंदाज श्रेयस अय्यरच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. या ताज्या मानांकन यादीत श्रेयस अय्यर आता संयुक्त 20 व्या स्थानावर आहे. त्याचे स्थान 7 अंकांनी वधारले आहे.
बुधवारी आयसीसीची वनडे फलंदाजांची ताजी मानांकन यादी जाहीर करण्यात आली. भारताच्या श्रेयस अय्यरने बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 24 धावा जमविल्या होत्या. तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने 49 धावांचे योगदान दिले होते. वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपले अनुक्रमे नववे आणि दहावे स्थान कायम राखले आहे. भारताचा के. एल. राहुल या यादीत 35 व्या स्थानावर आहे. वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये भारताच्या 2 फलंदाजांचा समावेश आहे.
आयसीसीच्या वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत पहिल्यांदाच भारताच्या मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर यांचा समावेश झाला आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सिराज आणि शार्दुल यांनी दर्जेदार कामगिरी केली होती. या यादीत सिराज 26 व्या स्थानावर आहे. लंकेचा हसरंगा आणि सिराज हे संयुक्त 26 व्या स्थानावर आहेत. शार्दुल ठाकुर 42 व्या स्थानावर असून बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसनने 9 व्या स्थानावर झेप घेतली आहे. अफगाणचा रशिद खान 6 व्या स्थानावर आहे.
आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाच्या लाबुशेनने अग्रस्थानावर झेप घेताना इंग्लंडच्या ज्यो रुटला पहिल्या स्थानावरून खाली खेचले आहे. लाबुशेनने विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत द्विशतक आणि शतक झळकविले होते. कसोटी गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाच्या नाथन लियॉनने 15 वे स्थान मिळविले आहे. विंडीजचा कर्णधार पेग ब्रेथवेटने या यादीत पुन्हा पहिल्या 20 क्रिकेटपटूंमध्ये स्थान मिळविले आहे.