27 रोजी नूतन मूर्ती स्थापना, विविध धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
म्हापसा : गणेशपुरी म्हापसा येथील श्री गणेश पुन:प्रतिष्ठापना सोहळा सोमवार दि. 27 रोजी होणार असून यानिमित्त दि. 22 पासून विविध धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनुष्ठान काळात चारही वेदांचे पारायण होणार आहे. दि. 22 रोजी सकाळी मंगलाचरण, गणेशपूजन आदी धार्मिक विधी झाले. सायंकाळी सोहळ्यानिमित्त आयोजित जाहीर सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन उद्घाटक डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो तथा म्हापसाच्या नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर यांच्या उपस्थितीत झाले. तद्नंतर स्वामी समर्थ ग्रुप निर्मित ‘मृद्ग-धा’ हा पखवाज वाद्यांचा कार्यक्रम झाला. दि. 23 रोजी सकाळी मंगलाचरण, गणेशपूजन, संभारदान, विष्णूपूजन आदी धार्मिक विधी तथा सायंकाळी सुदर्शन याग व राक्षोघ्न होम विधी झाला. दि. 24 रोजी सकाळी मंडप प्रतिष्ठा, गणेश याग, जलाधिवास आदी धार्मिक विधी तथा सायंकाळी सिद्धकला नृत्य संस्था आयोजित जान्हवी बोंद्रे संचालित ‘मनोमय’ हा सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम सादर झाला. आज शनिवार दि. 25 रोजी सकाळी 7 ते दु. 1 पर्यंत प्राकारशुद्धी, शय्याधिवास, देवता आवाहन, वास्तुहोम आदी धार्मिक विधी होतील. तद्नंतर सायं. 7.30 वा. गणेशपुरी हौशी कलाकार प्रस्तुत ‘आनंदोत्सव’ उत्सव आमच्या संस्कृतीचा हा कार्यक्रम सादर होणार आहे. संकल्पना मोना आशिष कवळेकर यांची असून कला दिग्दर्शक दिक्षा दिलीप नाईक या आहेत. दि. 26 रोजी देवता पूजन, तत्त्व होम आदी विधी होतील. रात्री 9 वा. प्रगतललना महिला मंडळ प्रस्तुत महेश नाईक लिखित व उमाकांत कोरगांवकर दिग्दर्शित कोकणी नाटक ‘आगळें तू, वेंगळें हांव’ सादर करण्यात येईल. दि. 27 रोजी सकाळी 7 ते दु. 1 पर्यंत मंगलाचरण, प्राकारशुद्धी, करवीरपीठ शंकराचार्य जगद्गुरु विद्या नरसिंह भारती यांच्याहस्ते सकाळी 8.13 वा. शिखर कलश स्थापना व नंतर सकाळी 9.03 वा. श्रीगणेश मूर्ती स्थापना, तत्त्वन्यास, प्राणप्रतिष्ठा, महापूजा, बलिदान, महापूर्णाहुती, महाआरती, सांगणे व महाप्रसाद होईल. सकाळी 10 वा. स्वामींची पाद्यपूजा होईल. त्याचप्रमाणे श्री गणेश मूर्ती स्थापनेनंतर सकाळी 11 वा. सार्वजनिक श्री सत्यविनायक महापूजा होणार आहे. सायं. 7 वा. प्रगतललना महिला संघ गणेशपुरी आणि वेद व ध्यान साधना म्हापसातर्फे ‘गणेश वंदना- गुरुवंदना व अथर्वशीर्ष पठण’ कार्यक्रम होणार आहे. संकल्पना रुपाली गवंडळकर यांची आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन गणेशपुरी विश्वस्त मंडळ अध्यक्ष सत्यवान भिवशेट, सचिव अॅड. पांडुरंग बाणावलीकर व खजिनदार विश्वास पिळर्णकर यांनी केले आहे.