क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे श्री मिर्जा इस्माईल शाहीद चषक फर्स्ट डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत स्वप्निल एळवेच्या दमदार दीडशतक व फैजान सिद्दीकसमवेत केलेली 158 धावांची भागीदारी आणि दुष्यंत वेंकटची भेदक गोलंदाजी यांच्या जोरावर चिंतामण स्पोर्ट्स असोसिएशन संघाने मॉडर्न क्रिकेट क्लबवर आघाडी मिळवत 2 गुण मिळविले. शतकवीर स्वप्निल एळवेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
बेंगळूर येथे सुरू असलेल्या श्री मिर्जा इस्माईल चषक फर्स्ट डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत मॉर्डन क्रिकेट क्लब संघाने 65.3 षटकात सर्व बाद 233 धावा केल्या. मिलिंद रमेशने 59, जसवंत आचार्यने 51, रौनकने 29, पृथ्वी सदानंदने 21, तर राहुल वेर्णेकरने 15 धावा केल्या. चिंतामणी संघातर्फे दुष्यंत वेंकटने 85 धावात 5, लिखीत बन्नूरने 62 धावात 2 तर अभिषेक प्रभाकर, मोहित पिमलापूरकर व अब्दुल मिर्जा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना चिंतामणी स्पोर्ट्स संघाने 79.4 षटकात 6 बाद 295 धावा करून आघाडी मिळविली. स्वप्निल एळवेने 3 षटकार 22 चौकारासह 173, फैजान सिद्दीकने 52, अब्दुल माजीदने 33 तर कौनेन अब्बासने 19 धावा केल्या. मॉडर्नतर्फे धीरज गावडाने 77 धावात 3 तर तहाखान, रौनक व महंमद जावड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यात स्वप्निल व फैजान यांनी चौथ्या गडय़ासाठी 158 धावांची भागीदारी केली.