काम अत्यंत धिम्या गतीने असल्याचे मंत्र्यांनी केले मान्य. कंत्राटदारावर कारवाई करणार. पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली नार्वेला भेट
डिचोली / प्रतिनिधी
मये मतदारसंघातील नार्वे या गावात असलेल्या ऐतिहासिक श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या नूतनीकरणाचे काम जे राज्य पुरातत्व खात्याने हाती घेतले आहे ते अत्यंत धिम्या गतीने चालू आहे. 2019 साली या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. मात्र अपेक्षेप्रमाणे ते झाले नसल्याची खंत पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी नार्वे येथे व्यक्त केली. या कामाचा संपूर्ण अहवाल मागवून घेतला जणार असून कामाला गती देण्यासाठी कंत्राटदाराची चौकशी करणार, असा इशारा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी यावेळी दिला.
नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या कामाची पाहणी करण्यासाठी पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल शुक्र. दि. 21 ऑक्टो. रोजी भेट दिली होती. यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, नार्वेचे सरपंच संदेश पार्सेकर, देवस्थान अध्यक्ष पृथ्वीराज सरदेसाई, सचिव राजाराम दिवकर, पुरातत्व खात्याचे अधिकारी व इतरांची उपस्थिती होती.
या मंदिराचे ज्या गतीने काम व्हायला हवे होते त्या गतीने झालेले नाही. या मंदिराचे ऐतिहासिक स्वरूप राखत ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मंदिर उभारलं होतं. त्याचप्रमाणे या मंदिराचे काम खास कंत्राटदाराकडून हाती घेण्यात आले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून केवळ दोन कामगारांना घेऊन कंत्राटदार या मंदिराचे काम पुढे नेत आहे. जे असमर्थनिय आहे. बांधकाम अद्याप झालेले नसल्याने पुढील वीज व इतर कामाचा खोळंबा झालेला आहे. या अपूर्ण कामामुळे देवस्थानच्या विविध उत्सवांवर परिणाम होत आहे. याकडे गंभीरपणे लक्ष देताना कंत्राटदाराची चौकशी केली जाणार आहे. असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.
या मंदिराच्या कामासाठी लागणारा संपूर्ण निधी पुरातत्व खात्याने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सोपविला आहे. बांधकाम खात्याने हे काम वेळेत पुढे न्यायला हवे होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही या कामावर लक्ष ठेऊन असून त्यांनीही एकदा या कामाचा अहवाल मागविला होता. तरीही या कामाला गती आली नाही. आतापर्यंत केवळ 60 टक्केच काम झाले असून उर्वरीत कामाला गती देण्यासाठी कंत्राटदाराची चौकशी करण्यात येणार. त्याला या कामाची स्पष्ट ताकीद देताना पुढील सहा महिन्यात हज काम पूर्ण करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार, असेही यावेळी मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
मये मतदारसंघातील मये, नार्वे य गावांना पर्यटन व ऐतिहासिक दृष्टय़ा वाव आहे. या भागाचा पर्यटनदृष्टय़ा विकास व्हावा हि आमची पूर्वीपासूनच मागणी आहे. नार्वेतील हे सप्तकोटेश्वर मंदिर याच पर्यटनातील एक महत्वाचे ऐतिहासिक स्थान आहे. या मंदिराचे रखडलेले काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याकडे आपण मागणी केली होती. तसेच पाहणी करण्याचीही त्यांना मागणी केली होती. यावर त्यांनी या मंदिराची पाहणी केली असून मंदिराच्या रखडलेल्या कामाला आता गती मिळणार आणि मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढील सहा महिन्यात ते पुर्णत्वाकडे जाणार अशी अपेक्षा आहे. या कामी आवश्यक असलेले सर्व सहकार्य आपण व या गावातून मिळणार, असे यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.
मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार प्रेमेंद्र शेट, सरपंच संदेश पार्सेकर व इतरांनी यावेळी संपूर्ण मंदिराच्या आतून व बाहेरून सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. कामाची गती पाहून मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी उपस्थित देवस्थान समितीच्या पदाधिकाऱयांनी विविध गोष्टी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. अर्धवट कामामुळे मंदिरातील विविध वार्षिक उत्सव, विधी कार्यांवर परिणाम होत आहे. लोकांची, भाविकांचीही गैरसोय होते. त्यासाठी या कामाला गती देत ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली.