वार्ताहर/ किणये
खास अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मौजे किणये येथे किणये ग्रामस्थांच्यावतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापना व उद्घाटन सोहळा असा दुहेरी कार्यक्रम सोमवार दि. 2 मे रोजी गणेश मंदिरासमोर आयोजित करण्यात आला आहे.
किणये ग्रामस्थांनी गावातील गणपती मंदिरासमोर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारण्याचा संकल्प केला होता. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच अनगोळ येथील विक्रम पाटील या मूर्तीकाराकडून पंचधातूतील छत्रपती शिवरायांची मूर्ती आणण्यात आली होती. सोमवारी या मूर्तीचे अनावरण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व मूर्तीचे पूजन विधान परिषद सदस्य चन्नराज हटीहोळी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सोमवारी पहाटे 4 वाजता काकड आरती, 8 वाजता गोमाता पूजन त्यानंतर गणहोम करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते 2 या वेळेत उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत शिवजयंती उत्सव व रात्री 9 वाजता शिवशाहीर शुभम अवधूत विभुते आणि पार्टी सांगली यांचा पोवाडय़ाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री जागरणसाठी संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.