केरये-खांडेपार येथील श्री विष्णू सोमनाथ मंदिराचा नूतन मूर्ती पुनःप्रतिष्ठापना, शिखर कलाशारोहण व नूतन शिवलिंग प्रतिष्ठापना सोहळा सोमवार दि. 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त या प्राचीन व जागृत देवस्थानची महती व इतिहास सांगणारा हा लेख…
निसर्गसंपन्न अशा गोमंतभूमीला प्राचीन मंदिरांचा मोठा वारसा लाभलेला आहे. येथील खेडय़ापाडय़ात अनेक छोटी-मोठी श्रद्धास्थाने हा सांस्कृतिक ठेवा जपताना दिसतात. देवभूमी अंत्रुज महाल म्हणजेच फोंडा तालुक्यातील असेच एक श्रद्धास्थान म्हणजे केरये खांडेपार येथील श्री विष्णू सोमनाथ मंदिर होय. हे मंदिर फोंडा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर केरये-खांडेपार येथे डेंगर पायथ्याशी वसले आहे. डोंगर माथ्यावरून येणाऱया दोन नदी प्रवाहाच्या संगमावर सुंदर अशा स्थानावर गेली अनेक शतके श्री विष्णू सोमनाथ देवालय उभे आहे. भक्तांच्या हाकेला पोहोचणारे जागृत स्थान अशी त्याची ख्याती आहे. श्री विष्णू सोमनाथ यांची महती या महामार्गावरून जाणाऱया हजारो प्रवाशांना माहिती आहे. या महामार्गावर घडलेल्या एका अपघातातून दीड महिन्याच्या मुलाला कसलीही इजा न होता सावरणाऱया या स्थानाचा प्रत्यय अशा अनेक घटनांमधून लोकांना आलेला आहे. नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेला धावणारा म्हणून भाविक मोठय़ा श्रद्धेने या स्थानाला भेट देतात.
या मंदिराला जवळजवळ अर्धसहस्त्र किंबहुना हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असावा, असे वयोवृद्ध जाणकार सांगतात. पोर्तुगीजकालीन दस्तऐवजामध्ये या देवस्थानची ठळक नोंद सापडते. शंभू महादेवाचे हे मंदिर खांडेपार गावच्या श्री शांतादुर्गा प्रमुख पंचायतन देवतांपैकी एक असून देवालय प्राकारात श्री गणेश, क्षेत्रपाल दिसून येतात. पोर्तुगीज राजवटीमध्ये मंदिराची केवळ पडझड होऊन चिरेबंदी भिंती भग्नावस्थेत होत्या. त्यामुळे तिकडे दुर्लक्ष होऊन देवाची नित्य पूजा-अर्चा व उत्सव, मंदिराचे सर्व व्यवहार आर्थिक कारणामुळे ठप्प झाले होते. अशा परिस्थितीत गावातील काही व्यक्तींनी मंदिरातील त्याकाळचे शिवलिंग पिंडिका व नंदी महाराज यांना गावच्या ग्रामदेवता श्री शांतादुर्गा (खांडेकरीण) मंदिरामध्ये नेऊन स्थापन केल्या व तिकडे त्याची पूजा सुरू केली. हे शिवलिंग आजही मंदिरात आहे पण असे केल्यामुळे तिकडच्या स्थानिक केरयेवाडा, तळेवाडा, नंदनवाडा येथील ग्रामस्थांनी दरवर्षी गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री सत्यनारायण महापूजा बिकट परिस्थितीतही सुरू ठेवली. कालांतराने अशुभ संकेतामुळे तेथील वाडय़ावरच्या काही व्यक्तींनी ग्रामदेवतेचा कौल घेऊन विचारणा केली असता, जरी देव श्री विष्णू सोमनाथ यांची पिंडी भलेही ग्रामदेवता शांतादुर्गेच्या ठिकाणी नेली असली तरी देव पूर्वीच्या मूळ स्थानीच आहे. आपण हे स्थान सोडून कुठेही गेलेलो नाही, असा शब्द मिळाला. देवाचा हा कौल शिरसावंद्य मानून काही गावकऱयांनी मंदिर बांधण्याचा असफल प्रयत्न केला. पुन्हा एकदा 1985 ते 92 साली नंदनवाडा येथील वयोवृद्ध कै. रामा गावडे, तळेवाडा येथील कै. खुशाली गावडे, कै. नारु गावडे, रोहिदास गावडे व इतर कुटुंबीय तसेच अर्चक कै. फोंडू कृष्णा भट गावकर व त्याकाळचे पंचसदस्य मोहन नाईक यांनी पुढाकार घेऊन अथक प्रयत्नांनी छोटेसे कौलारू मंदिर बांधून चैत्र कृष्ण 7मी शके 1914 शुक्रवार 24 एप्रिल 1992 रोजी ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत पुन्हा पिंडीकेची प्रतिष्ठापना केली व या देवाची नियमित पूजा-अर्चा सुरू केली.
मंदिराच्या ठिकाणी महाशिवरात्री, गुढीपाडव्याच्या दिवशी श्री सत्यनारायण पूजा, वर्धापनदिन व आठवडय़ाच्या दर सोमवारी भजन असे कार्यक्रम सुरू झाले परंतु या मंदिराचे बांधकाम भग्नावशेष वापरून पक्के नसल्यामुळे समस्त ग्रामस्थ, हितचिंतक, भक्तगणांनी 11 नोव्हें. 2016 रोजी श्री विष्णू सोमनाथ मंदिराचा पुनःनिर्माणाचा संकल्प सोडत भूमीपूजन, पायाभरणी केली व महाराजांच्या आशीर्वादाने या मंडळींचे अथक परिश्रम फळाला आहे. श्रींच्या कृपेने 2022 ला मुहूर्त लाभला व आज या ठिकाणी सुबक असे मंदिर उभे राहिले आहे.
या मंदिराचा नूतन मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलाशारोहण सोहळा चैत्र कृष्ण 10मी शके 1944 शुभकृत नामसंवत्सर सोमवार दि. 25 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वा. 24 मि. शुभ मुहूर्तावर शिखर कलशारोहण व 11.16 मि. नूतन शिवलिंग प्रतिष्ठापना सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा होणार आहे.
– विवेक गावकर पांचमे खांडेपार