दक्षिणेतील सुपरस्टार कमल हासन यांच्याप्रमाणेच त्यांच्या मुलीही प्रसिद्ध आहेत. मोठी मुलगी श्रुती सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असते. गॉथ कल्चर ती फॉलो करायची, यात तिने स्वतःची एक वेगळी ओळख आणि स्थान निर्माण केले होते. परंतु अभिनेत्री आता स्वतःचे आयुष्य आणि अडचणींमध्ये गुंतून पडली आहे. सध्या ती कुठल्याच चित्रपटात काम करत नाही, यामागे कारण तिचे आरोग्य आहे. अलिकडेच श्रुतीने पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम) आणि एंडोमेट्रियॉसिसबद्दल खुलासा केला आहे. योग्य आहार आणि शरीराला विश्रांती देत या आजारातून बरी होत असल्याचे तिने म्हटले आहे.
पीसीओएस एकप्रकारचा हार्मोनल डिसऑर्डर असतो. या आजारात स्थुलत्व आणि अनेकदा मधुमेहाच्या समस्येलाही तोंड द्यावे लागते. इन्स्टाग्रामवर स्वतःच्या याच समस्यांबद्दल बोलताना 36 वर्षीय श्रुतीने स्वतःचा एक वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे. मी योग्य आहार घेतेय, चांगली झोप मिळवत असल्याचे तिने म्हटले आहे.
श्रुती ‘3’, ‘प्रेमम’, ‘रेस गुर्रम’, ‘वकील साब’ या चित्रपटांसाठी ओळखली जाते. या सर्व चित्रपटांमध्ये काम करतानाही श्रुती पीसीओएस आणि एंडोमेट्रियॉसिसला तोंड देत होती. दोन्ही समस्यांचा तिने स्वतःच्या कामावर परिणाम होऊ दिला नाही. माझे शरीर परिपूर्ण नसले तरी माझे मन आहे. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे ती म्हणाली. श्रुती पुढील काळात प्रभाससोबत ‘सालार’ या चित्रपटात दिसून येणार आहे.