कमल हासन यांची कन्या श्रुतीने यापूर्वी आंतरराष्ट्रीय ऑडिओ ड्रामा ‘सँडमॅन ः ऍक्ट11’मध्ये काम केले होते. तर श्रुतीने आता स्वतःच्या आगामी हॉलिवूडपटाचे चित्रिकरण ग्रीसमध्ये सुरू केले आहे. डॅफने शमनकडून दिग्दर्शित सायकोलॉजिकल थ्रिलर ‘द आय’मध्ये श्रूती काम करत आहे. यात ‘द लास्ट किंग्डम’ फेम अभिनेता मार्क रोली मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने श्रुतीला मोठा आनंद झाला आहे. ‘ग्रीसमध्ये मी का आहे याची माहिती देताना मला अत्यानंद होतोय. या विशेष आणि मोठय़ा प्रोजेक्टचा हिस्सा होता आल्याने माझ्यामध्ये बळ संचारले असल्याचे श्रुतीने म्हटले आहे.


1980 मधील सेट दर्शविणाऱया या चित्रपटाला एक डार्क सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणून सादर करण्यात येणार आहे. या चित्रपटाची कहाणी एका विधवा महिलेच्या अवतीभोवती घुटमळणारी आहे. स्वतःच्या पतीचा ज्या बेटावर मृत्यू झाला होता तेथे ही महिला जात असल्याचे चित्रपटात दर्शविण्यात येणार आहे.
श्रुती हासन याचबरोबर ‘सालार’मध्ये प्रभाससोबत झळकणार आहे. तर नंदामुरी बालकृष्ण यांच्यासोबत ती ‘एनबीके 107’मध्ये दिसून येणार आहे. तसेच मेगास्टार चिरंजीवी यांच्यासोबत ‘चिरू 154’ चित्रपटात ती काम करणार आहे.