ससेक्सविरुद्ध लढतीत ग्लॅमर्गन संघातर्फे 139 चेंडूत 119 धावांची खेळी
होव्ह-युके / वृत्तसंस्था
युवा भारतीय फलंदाज शुभमन गिलने कौंटी क्रिकेटमध्ये आपले पहिलेवहिले शतक साजरे केले. त्याने सध्या सुरु असलेल्या कौंटी चॅम्पियनशिप डीव्हिजन-2 सामन्यात ग्लॅमर्गनतर्फे ससेक्सविरुद्ध खेळताना 139 चेंडूत 119 धावांचे योगदान दिले. त्याच्या या शानदार शतकी खेळीत 16 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला. त्याने 85.61 च्या सॉलिड स्ट्राईकरेटने फटकेबाजी केली. अंतिमतः त्याला जॅक कार्सनने बाद केले. ग्लॅमर्गनने आपला पहिला डाव 9 बाद 533 धावांवर घोषित केला.
पंजाबच्या या शैलीदार फलंदाजाने कौंटी क्रिकेट हंगामाला उत्तम प्रारंभ करताना वोर्सेस्टरशायरविरुद्ध 148 चेंडूत 92 धावांची खेळी साकारली. त्यानंतर मिडलसेक्सविरुद्ध केवळ 22 व 11 धावांवर त्याला समाधान मानावे लागले होते.
ससेक्सविरुद्ध त्याने 119 धावा जमवल्यानंतर कौंटी हंगामातील 4 डावात त्याच्या आता 61 च्या सरासरीने 244 धावा झाल्या असून यात एक शतक व एका अर्धशतकाचा समावेश आहे.
यापूर्वी ऑगस्टमध्ये गिल उर्वरित केंटी चॅम्पियनशिप हंगामात ग्लॅमर्गनतर्फे खेळेल, असे जाहीर करण्यात आले होते. नंतर झिम्बाब्वे (3 सामन्यात 1 शतक, 1 अर्धशतकासह 245 धावा) व विंडीजविरुद्ध (3 सामन्यात 2 अर्धशतकांसह 205 धावा) तो मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता.
शुभमन गिल हा ग्लॅमर्गन संघाचे प्रतिनिधीत्व करणारा एकूण तिसरा भारतीय खेळाडू असून यापूर्वी माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 1987 ते 1991 तर विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी 2005 मध्ये या संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.
कौंटी चॅम्पियनशिपच्या सध्या सुरु असलेल्या दुसऱया डीव्हिजनमध्ये ससेक्सचा संघ झगडत असून आतापर्यंत 13 सामन्यात त्यांना केवळ एकच विजय मिळवता आला आहे. याशिवाय, 6 सामन्यात पराभव पत्करावे लागले तर 6 सामने अनिर्णीत राहिले आहेत. गुणतालिकेत 120 गुणांसह त्यांना तळाकडून दुसऱया स्थानी समाधान मानावे लागले आहे. या लढतीत गिलबरोबरच ख्रिस कूकने (141) देखील शानदार शतक साजरे केले. याशिवाय, कर्णधार डेव्हिड लॉईड (56) व एजाझ पटेल (नाबाद 51) यांनी अर्धशतके झळकावली. ससेक्सतर्फे सीन हंटने 84 धावात 3 बळी घेतले.
ससेक्सने प्रत्युत्तरात दिवसअखेर 1 बाद 88 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार टॉम हेन्स 38 तर टॉम अल्सोप 3 धावांवर नाबाद राहिले. या सामन्यात दुसऱया दिवसअखेर ते 445 धावांनी पिछाडीवर होते.