तिसऱया व शेवटच्या वनडेत यजमान झिम्बाब्वेवर 13 धावांनी मात, शुभमनला सामनावीर व मालिकावीर पुरस्कार
हरारे / वृत्तसंस्था
सिकंदर रझाच्या तडफदार शतकानंतरही यजमान झिम्बाब्वेला भारताविरुद्ध तिसऱया व शेवटच्या वनडेत 13 धावांनी निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. भारताने शुभमन गिलच्या 97 चेंडूतील 130 धावांच्या खेळीमुळे निर्धारित 50 षटकात 8 बाद 289 धावांचा डोंगर रचला, त्यावेळी भारतीय संघ विजयासाठी भक्कम स्थितीत होता. सिकंदर रझाच्या 95 चेंडूतील 115 धावांच्या आक्रमक खेळीमुळे नंतर झिम्बाब्वेने आव्हान जरुर उभे केले. पण, अगदी अंतिम टप्प्यात त्यांना अननुभवाचा फटका बसला आणि भारताला निसटता विजय मिळवता आला. भारताने ही मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली.
विजयासाठी 290 धावांचे आव्हान असताना झिम्बाब्वेला 49.3 षटकात सर्वबाद 276 धावांपर्यंत झेपावता आले. सिकंदर रझा व ब्रॅड इव्हान्स (36 चेंडूत 28) यांनी आठव्या गडय़ासाठी 77 चेंडूतच 104 धावांची भागीदारी करत हा सामना रोमांचक स्थितीत आणला. मात्र, 49 व्या षटकात शुभमन गिलने पुढे झेपावत अप्रतिम झेलासह रझाची खेळी संपुष्टात आणली आणि इथेच झिम्बाब्वेच्या संघर्षाला जणू पूर्णविराम मिळाला.
तत्पूर्वी, भारतीय संघातर्फे शुभमन गिलचे शतक लक्षवेधी ठरले. आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या 3 वर्षानंतर त्याचे हे पहिलेच धवल यश आहे. इशान किशनने 61 चेंडूत 50 धावांसह त्याला उत्तम साथ दिली. शुभमन गिल सामनावीर व मालिकावीर पुरस्काराचा संयुक्त मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक
भारत ः 50 षटकात 8 बाद 289 (शुभमन गिल 97 चेंडूत 15 चौकार, 1 षटकारासह 130, इशान किशन 61 चेंडूत 6 चौकारांसह 50, शिखर धवन 68 चेंडूत 5 चौकारांसह 40, केएल राहुल 46 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 30, संजू सॅमसन 15. अवांतर 10. ब्रॅड इव्हान्स 10 षटकात 54 धावात 5 बळी, व्हिक्टर, ल्यूक जाँग्वे प्रत्येकी 1 बळी).
झिम्बाब्वे ः 49.3 षटकात सर्वबाद 276 (सिकंदर रझा 95 चेंडूत 9 चौकार, 3 षटकारांसह 115, सीन विल्यम्स 46 चेंडूत 7 चौकारांसह 45, ब्रॅड इव्हान्स 28. अवांतर 14. अवेश खान 9.3 षटकात 66 धावात 3 बळी, दीपक चहर, कुलदीप यादव, अक्षर पटेल प्रत्येकी 2 बळी, शार्दुल ठाकुर 1-55).