ऑनलाईन टीम / तरुण भारत :
बेंगळूरमधील एका पार्टीत ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
बेंगळूर पोलिसांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, बेंगळूरमधील एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये सिद्धांत कपूरसह काही जणांची पार्टी सुरू होती. या पार्टीत या सहा जणांनी ड्रग्ज सेवन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या पार्टीवर धाड टाकली. संशयितांच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी तपासणीसाठी पाठवले. त्यामध्ये सिद्धार्थसह 6 जण ड्रग्ज सेवनात पॉझिटिव्ह आढळले. पोलिसांनी या सहा जणांना ताब्यात घेतले असून, त्यांना अलसूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. या प्रकरणी शक्ती कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ओपन ड्रग्ज प्रकरणात सिद्धांतची बहीण आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरची एनसीबीने चौकशी केली होती. पण त्यातून काही निष्पन्न झाले नव्हते.