प्रतिनिधी / पणजी
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी जिल्हा पंचायत सदस्य सिध्देश श्रीपाद नाईक यांची निवड झाली आहे. त्यांनी काल शुक्रवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित झाली असून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
अर्ज सादर करताना त्यांच्यासोबत भाजपचे दामू नाईक व अन्य लोक उपस्थित होते.
निधी वाढवून मिळविण्यासाठी प्रयत्न
अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिद्धेश नाईक म्हणाले की प्रत्येक जिल्हा पंचायत सदस्याला त्याच्या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी दरवर्षी 35 लाख रुपये सरकारकडून निधी मिळत असतो, हा निधी वाढवून मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. निधी वाढवून मिळाल्यास सर्व सदस्य आणखी वेगाने काम करतील, असेही ते म्हणाले.
जिल्हा पंचायत भवनसाठी प्रयत्न
जिल्हा पंचायतीचे कार्यालय जूने असून उत्तर गोव्यात जिल्हा पंचायत भवन उभारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, ते काम वेगाने पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. प्रत्येक सदस्याची कार्यपध्दती पाहून पक्ष त्याच्यावर विविध कामाची जबाबदारी देत असतो. आपण केलेल्या कामाची पध्दत पक्षाने पाहिली असून त्यानुसार मला ही जबाबदारी दिली असावी, असेही ते म्हणाले.
केंद्रात आणि रज्यात भाजपचे सरकार असल्याने जिल्हा पंचायत सदस्यांना वाढीव निधी मिळण्याची शक्यता आहे, असे दामू नाईक यांनी सांगितले. प्रत्येक जिल्हा पंचायत सदस्य करत असलेल्या कामावर केंद्र सरकारची नजर आहे असेही दामू नाईक म्हणाले.