हळदोणा मतदारसंघात व विद्यालयात प्रथम येण्याचा मान
प्रतिनिधी /म्हापसा
हळदोणा येथील सेंट थॉमस गर्ल हायस्कूलमध्ये शिकणारी तथा पोंबुर्फा पंचायतीचे पंच सदस्य स्वप्नील चोडणकर यांची कन्या कु. सिद्धी स्वप्नील चोडणकर ही शालान्त परीक्षेत हळदोणा मतदारसंघातून आणि शाळेमधून पहिली आली आहे. 96.83 टक्के गुण तिने प्राप्त केले असून सोशल सायन्स व विज्ञान शाखेत तिने 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत.
पुढे जाऊन आपण राज्यातील एक उत्कृष्ट कॅन्सर डॉक्टर होणार असल्याचा मनोदय कु. सिद्धी चोडणकर यांनी दै. ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला. आपल्या आईला स्तन कॅन्सर झाला होता. तिच्यावर उपचार केल्यानंतर अखेर ती त्यातून बाहेर पडली असली तरी या कॅन्सरमुळे कशा वेदना होतात त्यावरील उपाय, किमीयो थॅरेपी आदी औषध दिल्यावर कसे हाल होतात हे आपण जवळून पाहिले आहे. असे कुणालाही न होवो यातूनच आपण आपले मन घट्ट केले आणि जनतेची सेवा करण्यासाठी आपण कॅन्सर स्पेशलिस्ट डॉक्टर होण्याचे मनात ठाम निश्चित केले. याबाबत आपण आपल्या पालकांनाही याची माहिती दिली त्यांनीही आपल्यास पाठिंबा दिला असून आपले शिक्षक वर्ग, पालक व आपल्या गावातील वयोवृद्धांच्या आशीर्वादाने हे मनोदय पुढे घेऊन जाणार असल्याची माहिती सिद्धी यांनी दिली.
आपण दररोज अभ्यास करीत होती. दहावी पर्यंत आपण वर्गात सदैव प्रथम आली आहे. आपल्या शिक्षकांची सदैव मदत लाभली यासाठी टय़ुशन घेण्याची गरज आपल्यास भासली नाही. उलट विज्ञानमध्ये 100, कोकणीमध्ये 99, हिंदीत 95, इंग्रजीत 93 तर गणितमध्ये 94 गुण प्राप्त केले अशी माहिती सिद्धी यांनी दिली.
त्यांनी सेंट झेवियर महाविद्यालयात अकरावीत प्रवेश मिळविला असून आपल्या यशाचे श्रेय वडील स्वप्नील, आई सपना तसेच शिक्षक वर्गांना दिले आहे. सिद्धी लहानपणापासूनच हुशार होती. तिला खेळ व अभ्यासाची आवड होती असे तिचे वडील स्वप्नील यांनी सांगितले.