पतियाला कारागृहाबाहेर समर्थकांचा जल्लोष
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांची पतियाला तुरुगातून सुटका करण्यात आली आहे. रोड रेजप्रकरणी सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. नवज्योतसिंग सिद्धू गेल्या 10 महिन्यांपासून पतियाला तुरुगात शिक्षा भोगत होते. रोड रेजप्रकरणी त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली होती. मात्र शनिवारी शिक्षा पूर्ण होण्याच्या 48 दिवस आधी त्यांची सुटका करण्यात आली आहे.
सिद्धू यांच्या सुटकेची माहिती शुक्रवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली होती. यासंबंधीचे वृत्त प्रसारमाध्यमांवर झळकल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला होता. तसेच शनिवारी सकाळपासून तुरुगाबाहेर ढोल-ताशांसह सिद्धूचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी 3 वाजेपर्यंत सिद्धू तुरुगाबाहेर येतील अशी अपेक्षा होती. मात्र, कागदपत्र पूर्ण करण्याचे काम पूर्ण होण्यासाठी बराच वेळ झाल्याने सुटकेला विलंब झाला.
सरकारवर हल्लाबोल
तुरुगातून बाहेर येताच नवज्योतसिंग सिद्धू यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत देशात लोकशाही नावाची गोष्ट उरलेली नाही, असे म्हटले आहे. पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे षड्यंत्र रचले जात असून अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे. तुम्ही पंजाबला कमकुवत करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही स्वत:च कमकुवत व्हाल, असे केंद्र सरकारला आव्हान देताना सिद्धू म्हणाले.