मादी बिबटय़ाची प्रतिक्षेत वनविभागाचे कर्मचारी तळ ठोकून
वार्ताहर/ परळी
किल्ले सज्जनगडावर मंगळवारी दुपारी 3.30 च्या दरम्यान गडावरील रामघळ परिसरात काही युवक भटकंती करत होते. यावेळी त्यांना अचानक बिबटय़ाचे बछडे वाटेत खेळताना दिसले. अचानकच दिसलेल्या बिबटय़ाच्या बछडय़ाच्या दर्शनाने युवकांची भंबेरी उडाली होती. ते युवक तसेच चार पावले मागे आले, मात्र आजुबाजुला बिबटय़ा नसल्याने त्यांचे धाडस वाढले व बछडय़ाचे फोटो काढण्यास पुढे सरसावले. काही वेळात ही घटना सज्जनगडावर समजताच युवकांची गर्दी वाढल्याने काहींनी तत्काळ वनधिकाऱयांना माहिती देण्यात आली. तत्काळ वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.
सज्जनगडावर वनविभागाच्या कर्मचाऱयांना बिबटय़ाचा बछडा निदर्शनास आला. पण मादा बिबटय़ा कोठेच दिसत नव्हती. त्यामुळे वनविभागाचे जवळपास सह ते आठ कर्मचारी सज्जनगड परिसरात बिबटय़ाच्या बछडय़ाजवळच तळ ठोकून आहेत. बछडय़ाची मादा येईपर्यंत हे कर्मचारी जवळपास पुढील दोन दिवस याच परिसरात तळ ठोकून राहणार आहेत. जर तरी ही मादा न आल्यास पुढील निर्णय वरिष्ठांच्या आदेशानुसार घेण्यात येणार आहे. अनेकदा सज्जगडावर बिबटय़ाचा वावर आहे, असे सांगण्यात येत होते. मात्र ही गोष्ट आता बिबटय़ाचा बछडा पाहिल्याने अधोरेखीत झाली आहे.
वनविभागाच्या कर्मचाऱयांनी हा बछडा घाबरून जावू नये, याची सर्व दखल घेतली आहे. याकरीता सर्व कर्मचाऱयांनी आपल्यासोबत असलेले मोबाईल साईलेंटवर ठेवले आहेत. आपापसात ही काही बोलावयाचे असल्यास अगदी सौम्य आवाजात किंवा ईशाऱयाने हे कर्मचारी बोलत आहेत. या बछडय़ावर चोवीसतास नजर ठेवून कर्मचारी आहेत.
जवळपास दिड महिन्याचा बछडा
आम्हाला कळाल्या बरोबरच आम्ही आमच्या टिम समवेत येथे दाखल झालो आहेत. सदर बिबटय़ाचा बछडा पाहता जवळपास दिड महिन्याचा असावे, असा अंदाज आहे. बछडा घाबरून जावू नये याची आम्ही दखल घेत आहोत, या बछडय़ाची व तिच्या मादाची भेट होईपर्यंत आम्ही आज व उद्याही संपूर्ण रात्र- दिवस टिमसोबत येथेच थांबणार आहोत.
निवृत्ती चव्हाण
उपवन संरक्षण अधिकारी