ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यात मागील काही दिवसांपूर्वी एक-दोन नव्हे तर तब्बल 43 बोगस शाळा आढळून आल्याने खळबळ माजली होती. आता हवेली तालुक्यातील चिखली येथील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल या शाळेच्या बोगस प्रमाणपत्रावर तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ यांची सही आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सौरभ राव अडचणीत येण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या शाळांमध्ये घालण्याचा पालकांचा कल पाहून राज्य शिक्षण मंडळाच्या अनेक शाळांनी सीबीएसईची मान्यता असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार केले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी सक्रिय असल्याचे उघड झाले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये पुण्यात 43 बोगस शाळा आढळून आल्या होत्या. त्यामधील 30 शाळा बंद आहेत. तर 13 शाळा अद्याप सुरू आहेत. मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांचा वापर करुन या शाळांना काही लाखांमध्ये बनावट प्रमाणपत्र देण्यात आली आहेत.
अधिक वाचा : मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला स्थान मिळावे
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना हवेली तालुक्यातील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूलच्या प्रमाणपत्रावर विभागीय आयुक्त सौरभ राव यांची स्वाक्षरी आढळली आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला आहे.