वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या केंट क्रिकेट क्लबबरोबर भारताचा नवोदित वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने नुकताच नवा करार केला आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज तसेच चेंडू स्वींग करण्यामध्ये तरबेज असणारा अर्शदीप सिंगने केंट क्रिकेट क्लबशी हा करार या स्पर्धेतील पाच सामन्यांसाठी केला आहे. केंट संघाचे हे सामने जून-जुलै दरम्यान सरे आणि वॉर्विकशायर यांच्याबरोबर होणार आहेत. 2019 च्या आयपीएल स्पर्धेत 24 वर्षीय अर्शदीप सिंगने आपल्या गोलंदाजीची चुणुक दाखवली होती. गेल्या उन्हाळी मोसमात अर्शदीप सिंगने इंग्लंडमध्ये आपले आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण पेले होते. तसेच त्याने गेल्या नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडमध्ये आपले वनडे क्रिकेट पदार्पण केले होते. अर्शदीप सिंगने आतापर्यंत 29 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 23.84 धावांच्या सरासरीने 25 बळी मिळवले आहेत.