दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील प्रवासी विमानांमध्ये शीखांना ‘कृपाण’ नेण्याची परवानगी देण्याविरोधात दाखल केलेली जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. सरन्यायाधीश सतीशचंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने याप्रश्नी निकाल देताना याचिका फेटाळली आहे. भारतातील सर्व देशांतर्गत मार्गांवर चालणाऱया प्रवासी उड्डाणांमध्ये शीख प्रवाशांना त्यांच्यासोबत कृपाण ठेवण्यासाठी विशिष्ट नियामक मान्यता असेल. त्यानुसार कृपाणच्या ब्लेडची लांबी सहा इंचांपेक्षा जास्त नसावी आणि कृपाणची एकूण लांबी नऊ इंचांपेक्षा जास्त नसावी, असे सांगण्यात आले.
विमानात कृपाण नेण्यास परवानगी देण्याच्या मुद्दय़ावर एक समिती स्थापन करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. केंद्र सरकारने 4 मार्च 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेला त्यांनी आव्हान दिले होते. हर्ष विभोर सिंघल यांच्या या याचिकेवर न्यायालयाने गुरुवारी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला. ‘कृपाण’संबंधी भारत सरकारचे धोरण ठरलेले असल्यामुळे न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे खंडपीठाने यापूर्वीही तोंडी सांगितले होते.